स्पोर्ट्स

ICC Player of the Month : आयसीसीकडून मोठी घोषणा; श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा ठरला 'प्लेअर ऑफ द मंथ'

शर्यतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि बांगलादेशचा हसन महमूद पडले मागे

रणजित गायकवाड

दुबई : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेच्या युवा फलंदाजाला त्याच्या उत्कृष्ट खेळाचे मोठे फळ मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १७ सप्टेंबर रोजी सोनल दिनुशा याला ऑगस्ट २०२६ या महिन्यासाठी 'आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून घोषित केले. दिनुशाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. या शर्यतीत त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि बांगलादेशचा हसन महमूद यांना मागे टाकून हे यश संपादन केले.

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या 'आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' मालिकेत दिनुशाच्या बॅटने जबरदस्त कामगिरी नोंदवली. मायदेशात झालेल्या या मालिकेत त्याने चार डावांत १४० च्या अप्रतिम सरासरीने तब्बल ४२० धावांचा डोंगर उभारला. या कालावधीत त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला.

या मालिकेपूर्वी दिनुशाने श्रीलंकेकडून अवघ्या तीन कसोटी सामन्यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मर्यादित अनुभव पाठीशी असतानाही संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून छाप पाडणे ही त्याच्यासाठी विशेष बाब ठरली.

मालिकेतील गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दिनुशाने दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले. पहिल्या डावात शतक (१०० धावा) झळकावल्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ८४ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, त्याच्या या वैयक्तिक खेळीनंतरही श्रीलंकेला १६५ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कोलंबो येथे पार पडलेली दुसरी कसोटी दिनुशासाठी अधिक अविस्मरणीय ठरली.

या लढतीत त्याने पहिल्या डावात १०३ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात नाबाद १३३ धावांची नाबाद खेळी साकारून पराभवाच्या छायेतून श्रीलंकेला सावरत सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला. या शानदार खेळासाठी त्याला 'सामनावीर' (प्लेअर ऑफ द मॅच) पुरस्कारानेही गौरवण्यात आले. दरम्यान, भारताने ही दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशा फरकाने आपल्या नावे केली.

आयसीसीकडून सन्मानित झाल्यानंतर दिनुशाने आनंद व्यक्त करत, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हा आंतरराष्ट्रीय सन्मान लाभणे अतिशय अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. आयसीसीचे आभार मानताना त्याने भारताविरुद्धची ही मालिका आपल्या स्मरणात कायम राहील असे सांगितले. मायदेशातील चाहत्यांसमोर गॉल आणि कोलंबो येथे शतके झळकावणे हे स्वप्नपूर्तीसारखे होते, अशी भावना त्याने व्यक्त केली. संघाला मालिकेचा अपेक्षित निकाल मिळवता आला नसला, तरी दुसऱ्या कसोटीत केलेल्या दमदार पुनरागमनाने संघातील खेळाडूंचा वाढलेला आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती अधोरेखित केली असल्याचेही त्याने शेवटी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT