ICC ODI World Cup 2027 Date: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सील अर्थात आयसीसीने आगामी वनडे वर्ल्डकपच्या तारखा निश्चित केल्या आहेत. यंदाचा वनडे वर्ल्डकप दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात होणार आहे. इएसपीएल क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार १४ संघाचा सहभाग असलेली ही स्पर्धा ४ ऑक्टोबर २०२७ पासून २१ नोव्हेंबर २०२७ पर्यंत खेळवली जाणार आहे. या तारखेवर आयसीसीच्या बोर्ड मिटिंगमध्ये शिक्कामोर्तब झालं आहे. ही बैठक आयपीएलदरम्यान अहमदाबादमध्ये झाली होती. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील फायनवेळी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, आयसीसीच्या एजीएममध्ये याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ही बैठक जुलै महिन्यात इडिनबर्ग इथं होणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये दक्षिण अफ्रिकेतील ८ ठिकाणी स्पर्धेतील ५४ पैकी ४१ सामने होणार आहेत. तर झिम्बाब्वेच्या तीन ठिकाणी सामने होणार आहेत. नामिबियात नवीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार होत आहे. त्याचे उद्घाटन पुढच्या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
दक्षिण अफ्रिकेत २००३ नंतर पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप होत आहे. या स्पर्धेत १४ संघांचा समावेश असून यापूर्वी युके आणि भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये १० संघांचा समावेश होता. आता १४ संघांचा फॉरमॅट परत आला असून या संघांचे दोन गटात विभाजन करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात सात संघ असून ग्रुपमध्ये टॉप ३ संघ सुपर सिक्समध्ये खेळतील.
2027 हा वनडे वर्ल्डकप रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. रोहित आपले वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोर लावेल तर विराट कोहली आपल्या शोकेशमध्ये अजून एक चमचमती ट्रॉफी ठेवण्यासाठी उतावळा झाला असेल. २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे या दोघांचा देखील स्वप्नभंग झाला होता.