स्पोर्ट्स

Test Cricket Rules : ICC कडून नव्या नियमांची घोषणा! वेळकाढूपणा, शॉर्ट रन, चेंडूशी छेडछाड... प्रत्येक गुन्ह्याला मिळणार शिक्षा

आता मैदानात पंचांचीच ‘दादागिरी’, क्रिकेटचे मैदान गाजवणार नवे नियम; क्रिकेट होणार अधिक कडक

रणजित गायकवाड

ICC rules for Test cricket Stop clock umpire to decide no balls ban on saliva

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. यापैकी काही नियम 2025-27 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) पासून लागू झाले आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमधील नियम 2 जुलैपासून अंमलात येतील. या बदलांमुळे पंचांच्या अधिकारांमध्ये वाढ झाली असून खेळाला अधिक गतिमान आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक' नियमाचा समावेश

एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला 'स्टॉप क्लॉक' नियम आता कसोटी क्रिकेटमध्येही लागू करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. या नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मागील षटक संपल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील षटक टाकण्यासाठी तयार राहावे लागेल. असे न केल्यास, पंचांकडून संबंधित संघाला दोनदा ताकीद देण्यात येईल. तिसऱ्यांदाही चूक घडल्यास, गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. तथापि, 80 षटकांनंतर पंचांनी दिलेली ताकीद रद्द होईल. हा नियम 2025-27 च्या WTC हंगामापासून लागू करण्यात आला आहे.

चेंडू बदलण्याचा निर्णय पूर्णपणे पंचांच्या अधिकारात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. अनेकदा गोलंदाज चेंडू खराब करून नवीन चेंडू मिळवण्यासाठी या नियमाचा गैरफायदा घेत असत. मात्र, आता आयसीसीने स्पष्ट केले आहे की, चेंडूवर लाळ लावली गेल्यास तो बदलणे पंचांसाठी अनिवार्य नसेल. केवळ चेंडू पूर्णपणे ओला झाला असेल किंवा त्याचे स्वरूप खराब झाले असेल, तरच तो बदलला जाईल. चेंडू बदलण्याचा अंतिम निर्णय पूर्णपणे पंचांच्या विवेकावर अवलंबून असेल, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त अधिकार प्राप्त झाले आहेत.

'नो-बॉल'वरील झेलाचीही होणार तपासणी

जर एखाद्या चेंडूवर मैदानावरील पंचांना झेलाबाबत संशय असेल आणि ते याबाबत चर्चा करत असतील, तेव्हा तिसऱ्या पंचाने (TV umpire) जर तो चेंडू नो-बॉल असल्याचे सांगितले, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव मिळायची आणि झेल योग्यरित्या घेतला गेला आहे की नाही याबाबत कोणतीही चर्चा होत नसे. मात्र, नव्या नियमानुसार, अशा परिस्थितीत तिसरे पंच झेल योग्य प्रकारे घेतला आहे की नाही, हेदेखील तपासतील. जर झेल योग्य असेल, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ 'नो-बॉल'ची एक धाव मिळेल. पण जर झेल योग्य प्रकारे घेतला नसेल किंवा सुटला असेल, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 'नो-बॉल'च्या धावेसह फलंदाजांनी पळून काढलेल्या धावादेखील मिळतील.

जाणूनबुजून 'शॉर्ट रन' घेतल्यास कठोर कारवाई

आतापर्यंत कोणताही फलंदाज 'शॉर्ट रन' घेताना आढळल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड ठोठावला जात होता. आता या नियमात बदल करण्यात आला आहे. जर एखादा फलंदाज जाणूनबुजून 'शॉर्ट रन' घेत असेल, तर पाच धावांच्या दंडासोबतच, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कोणत्या फलंदाजाला स्ट्राइकवर ठेवायचे आहे, हे ठरवण्याचा अधिकार दिला जाईल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्ण-वेळ बदली खेळाडूची तरतूद

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास, त्याच्या जागी पूर्ण-वेळ बदली खेळाडू मैदानात उतरवण्याची चाचणी घेण्यास आयसीसीने सदस्य देशांच्या क्रिकेट मंडळांना सांगितले आहे. हा बदली खेळाडू 'कन्कशन सब्स्टीट्यूट' प्रमाणेच असावा. दुखापत गंभीर आणि स्पष्टपणे दिसत असेल, तरच पंच बदली खेळाडूला परवानगी देतील. स्नायूंचा ताण किंवा किरकोळ दुखापतींसाठी हा नियम लागू होणार नाही. हा नियम सध्या चाचणी तत्त्वावर असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची अंमलबजावणी करणे पूर्णपणे संबंधित देशांवर अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT