Pravin Tambe IPL Hat Trick Pudhari
स्पोर्ट्स

IPL Hat Trick: 2 बॉलवर 3 विकेट्स! IPL मधील सर्वात धमाकेदार हॅटट्रिक कोणी केली होती? नंतर खेळाडूवर घातली बंदी

Pravin Tambe IPL Hat Trick: प्रवीण तांबे यांनी IPL 2014 मध्ये फक्त दोन लीगल चेंडूंमध्ये तीन विकेट्स घेत अनोखी हॅटट्रिक केली. ही IPL इतिहासातील सर्वात वेगळी हॅटट्रिक मानली जाते.

Rahul Shelke

Pravin Tambe IPL Hat Trick 2 Balls Record: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये अनेक भन्नाट विक्रम झाले आहेत, पण काही घटना अशा असतात ज्या आजही चाहत्यांच्या लक्षात राहतात. अशीच एक अनोखी आणि आश्चर्यचकित करणारी हॅटट्रिक 2014 मध्ये पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे ही हॅटट्रिक फक्त दोन ‘लीगल’ चेंडूंमध्ये पूर्ण झाली होती. हा विक्रम राजस्थान रॉयल्सचा माजी लेगस्पिनर प्रवीण तांबेच्या नावावर आहे.

IPL च्या इतिहासात सलग तीन चेंडूंवर तीन विकेट घेणे म्हणजे मोठं आव्हान असतं. आतापर्यंतच्या 18 सीझनमध्ये फार कमी गोलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. मात्र प्रवीण तांबेची हॅटट्रिक खास आहे, कारण त्याने फक्त दोन अधिकृत चेंडूंमध्ये तीन फलंदाज बाद करत इतिहास रचला.

ही घटना 5 मे 2014 रोजी अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात घडली. कोलकाता संघाच्या 16व्या षटकात तांबे गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर वाईड बॉल टाकला. त्या चेंडूवर फलंदाज मनीष पांडे क्रीजच्या बाहेर आला, पण चेंडूला स्पर्श करू शकला नाही. यष्टीरक्षक संजू सॅमसनने लगेच स्टंपिंग करून त्याला बाद केलं. हा चेंडू वाईड असल्यामुळे ‘लीगल’ मानला गेला नाही, पण विकेट मात्र मिळाली.

यानंतर तांबेने पहिल्या अधिकृत (लीगल) चेंडूवर युसुफ पठाणला ‘कॅच अँड बोल्ड’ केलं. पठाणने ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट तांबेच्या हातात गेला. त्यानंतरच्या दुसऱ्या अधिकृत चेंडूवर रायन टेन डोशाटेला LBW करून तांबेनी तिसरी विकेट घेतली. अशा प्रकारे फक्त दोन लीगल चेंडूंमध्ये तीन विकेट्स घेत त्याने अनोखी हॅटट्रिक पूर्ण केली.

प्रवीण तांबेची कारकीर्दही तितकीच वेगळी आहे. त्याने 41 व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं. 2013 ते 2016 या काळात त्याने 33 सामने खेळले आणि 28 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट सुमारे 7.75 होता.

मात्र त्याच्या कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला. BCCI ने त्याच्यावर IPL मध्ये खेळण्यास बंदी घातली. कारण त्यानी बोर्डाची परवानगी न घेता परदेशातील एका फ्रँचायझी लीगमध्ये सहभाग घेतला होता. या नियमभंगामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

प्रवीण तांबेची ही हॅटट्रिक IPL च्या इतिहासातील सर्वात अनोखी मानली जाते. दोन चेंडूंमध्ये तीन विकेट्स घेण्याचा हा विक्रम आजही क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठं आश्चर्य आणि चर्चेचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT