IPL franchise profit
दिल्ली : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवासोबत मुंबई या हंगामातील प्रवास संपुष्टात आला. आता ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे, जो क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी असेल. आयपीएलमध्ये या संघांना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझीचे मालक कोट्यवधी रुपये खर्च करतात. पण, तुम्ही कधी विचार केला का की, नीता अंबानी आणि प्रीती झिंटा सारख्या मालक स्पर्धेतून किती कमाई करतात? एकाच सामन्यातून मिळणारी कमाई वाचून आश्चर्यचकित व्हालं.
आयपीएल ही केवळ क्रिकेट स्पर्धा नाही तर एक मोठे व्यवसायाचे मॉडेल आहे. नवीन खेळाडूंना त्यांचा खेळ दाखविण्याची सुवर्णसंधी मिळते, तसेच खेळाडू लिलावात कोट्यवधी रुपये कमावतात. यासोबतच फ्रँचायझी मालकांनाही या स्पर्धेतून भरपूर कमाई होते. प्रत्येक आयपीएल सामन्याच्या तिकिट विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील ८० टक्के रक्कम थेट फ्रँचायझी मालकांच्या खात्यात जाते, असे मीडिया रिपोर्ट्स सांगतात. याशिवाय, संघाच्या जर्सीवर दिसणाऱ्या ब्रँडचे प्रायोजकत्व, मिडिया राइट्समधून मिळणाऱ्या पैशांचा मोठा भाग संघमालकांच्या खात्यात जात असतो.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या स्टेडियममध्ये एकाच वेळी एक लाख ३५ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयपीएलमध्ये तिकिटांची किंमत स्टेडियमच्या स्थान आणि आसनानुसार ३ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत असते. जर तिकिटाची सरासरी किंमत ३ हजार रुपये मानली आणि एक लाख प्रेक्षक सामना पाहायला आले तरी ३० कोटी रुपये तिकिटे विक्रीचे होतात. प्रत्येक स्टेडियमची आसन क्षमता आणि तिकिटांचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, फ्रँचायझी मालक प्रत्येक सामन्यातून कोट्यवधी रुपये नफा कमावतात. आयपीएलमुळे खेळाडूंना नावलौकीक मिळतोच पण संघ मालकांसाठी देखील मोठा आर्थीक फायदा होतो. कोट्यवधी रुपये गुंतवणारे संघमालक या स्पर्धेतून अनेक पटींनी जास्त नफा कमावतात.