हॉकी इंडियाने बुधवारी (दि. २०) आगामी पुरुष आशिया चषकासाठी १८ सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. ही प्रतिष्ठित स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत बिहारमधील नव्याने उभारण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर आयोजित केली जाईल. या स्पर्धेत भारताला जपान, चीन आणि कझाकस्तानसह 'गट अ' मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ आशिया चषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी चीनविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी भारताचा सामना जपानशी आणि १ सप्टेंबर रोजी कझाकस्तानशी होईल.
अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग आगामी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. एकंदरीत, आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक असतील.
स्पर्धेत गोलरक्षणाची जबाबदारी कृष्ण बी. पाठक आणि सूरज करकेरा सांभाळतील. बचावफळीत (डिफेन्स), कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अमित रोहिदास यांच्यासह जरमनप्रीत सिंग, सुमित, संजय आणि जुगराज सिंग यांचा समावेश आहे, जे संघाच्या बचाव विभागाला अधिक बळकटी देतील.
मध्यफळीत (मिडफिल्ड) मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंग, राज कुमार पाल आणि हार्दिक सिंग यांसारखे दमदार खेळाडू आहेत. आघाडीच्या फळीचे (फॉरवर्ड) नेतृत्व मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाकड़ा आणि दिलप्रीत सिंग करतील.
संघ जाहीर झाल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले की, ‘आम्ही एका अनुभवी संघाची निवड केली आहे. या खेळाडूंना दबावाच्या परिस्थितीत कशी कामगिरी करायची हे चांगलेच ठाऊक आहे. विश्वचषक स्पर्धेसाठीची आमची पात्रता पणाला लागली आहे. त्यामुळे आशिया चषक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला अशा खेळाडूंची गरज होती, ज्यांच्यामध्ये संयम आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याचे कौशल्य आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘मी संघाच्या संतुलनाने आणि गुणवत्तेने खूप समाधानी आहे. आमच्याकडे प्रत्येक विभागात (बचाव, मध्यफळी आणि आक्रमण) अनुभवी खेळाडू आहेत आणि हीच सांघिक कामगिरी महत्त्वाची आहे. मला वाटते की, हा संघ ज्याप्रकारे एकजुटीने खेळतो, तीच आमची सर्वात मोठी ताकद ठरेल.’
गोलरक्षक : कृष्ण बी. पाठक, सूरज करकेरा
बचावपटू (डिफेंडर) : सुमित, जरमनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग
मध्यरक्षक (मिडफिल्डर) : राजिंदर सिंग, राज कुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद
आघाडीची फळी (फॉरवर्ड) : मनदीप सिंग, शिलानंद लाकड़ा, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग