IND W vs ENG W Test : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  Pudhari
स्पोर्ट्स

IND W vs ENG W Test : भारीच..! विराट कोहली, सचिन तेंडुलकरला जमलं नाही ते हरमनप्रीतने करून दाखवलं!

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार अर्धशतकी खेळीने लॉर्ड्सवर केला नवा विक्रम नावावर

पुढारी वृत्तसेवा

Harmanpreet Kaur record at Lords : क्रिकेटमधील महाविक्रमांचा उल्लेख झाला की, चाहत्यांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही दोन नावे प्राधान्याने येतात. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या दोन्ही विक्रमवीरांना मागे टाकत एका नव्या, अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. संपूर्ण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी अभूतपूर्व कामगिरी करणारी ती पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.

अशी कामगिरी करणारी ठरली पहिली क्रिकेटपटू

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये कसोटी सामना (Indw vs Engw) सुरू आहे. शुक्रवारी या सामन्यात हरमनप्रीतने भारताच्या पहिल्या डावात ५८ धावांची संयमी खेळी केली. या कामगिरीमुळे हरमनप्रीत लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-२०) अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू (पुरुष किंवा महिला) ठरली आहे.

लॉर्ड्सवर ‘त्रिअर्धशतकी’ विक्रम पूर्ण

हरमनप्रीतने यापूर्वी लॉर्ड्सवर वन-डे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती. आता कसोटीतही अर्धशतक ठोकून तिने हा ‘त्रिअर्धशतकी’ विक्रम पूर्ण केला. लॉर्ड्सवर कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू बनली आहे.

कोलमडणारा डाव हरमनप्रीतने सावरला

सामन्याच्या सुरुवातीलाच भारताची स्थिती खराब झाली होती. सलामीवीर शफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया झटपट बाद झाल्याने पहिल्या ७ षटकांतच भारताची अवस्था २ बाद ३७ धावा अशी झाली होती. यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. जेमिमाने बाद होण्यापूर्वी ३८ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी केली, तिला इझी वाँगने बाद केले. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने डावाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली.

मानधना-हरमनप्रीतची महत्त्वपूर्ण भागीदारी

जेमिमा बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने स्मृती मानधनाच्या साथीने ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. कर्णधार हरमनप्रीतने अत्यंत आत्मविश्वासाने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. स्मृती मानधना शतकाच्या उंबरठ्यावर असताना ८३ धावांवर इझी वाँगच्या चेंडूवर बाद झाली. तर हरमनप्रीतची ५८ धावांची उत्कृष्ट खेळी चहापानाच्या ठीक आधी संपली. पदार्पण करणाऱ्या मॅडी विलियर्सने एका सुंदर ऑफ-ब्रेक चेंडूवर तिला बाद केले.

भारताचा पहिला डाव २८५ धावांवर आटोपला

चहापानापर्यंत भारताने ५ बाद २०२ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर संघाला या चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत भारताचे उर्वरित ७ गडी अवघ्या ८५ धावांत बाद केले. खालच्या फळीत दीप्ती शर्माने ५७ धावांची लढाऊ खेळी करत झुंज दिली. तिने स्नेह राणासोबत ४५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला पहिल्या डावात २८५ धावांपर्यंत मजल मारता आली.

इंग्लंडची सावध सुरुवात

भारताच्या २८५ धावांना चोख उत्तर देताना इंग्लंडने सावध सुरुवात केली आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा १ बाद २१ धावा केल्या. क्रांती गौडने सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्टला (२ धावा) लवकर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा माया बुशियर १७ धावांवर आणि कर्णधार हेदर नाइट क्रीजवर होत्या. इंग्लंडचा संघ अजूनही भारतापेक्षा २६४ धावांनी मागे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT