Haris Rauf Gesture Controversy :
आशिय कप २०२५ मध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलं. पहिल्या सामन्यात हस्तांदोलन न करताच भारतीय संघ पुढं निघून गेला होता. यामुळं चिडलेल्या पाकिस्ताननं थैयथैयाट करत आयसीसीकडे तक्रार करण्याचा रडीचा डाव खेळला. सामन्यावर बहिष्कार घाल्याची धमकी देखील दिली. मात्र पैशावर पाणी सोडावं लागणार म्हटल्यावर शेपूट घालून सामना खेळला.
भारताविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात १७५ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर पाकिस्तानला वाटलं की आपण सामना जिंकलोच. त्यामुळं त्यांच्या खेळाडूंनी आक्षेपार्ह हावभाव करण्यास सुरूवात केली. आधी साहिबजादा फरहाननं एके ४७ चालवत असल्याचे हावभाव केले. त्यानंतर आता हारिस रौफचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो भारतीय चाहत्यांना उकसवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
हारिस रौफ बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना भारतीय चाहत्यांनी त्याला विराट कोहलीची आठवण करून दिली. २०२२ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये विराटनं हारीसची चांगलीच धुलाई केली होती. मात्र याच्या प्रत्युत्तरात हारिस रौफ भारताची लढाऊ विमानं पाडल्याचे हावभाव करत ६-० असा स्कोअर दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रौफच्या या कृतीनंतर भारतीय चाहते जाम भडकलेले दिसले.
एवढंच नाही तर भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईच्या आयसीसी अकॅडमीत सरावावेळी देखील असंच केलं होतं. यावेळी असं कृत्य करणारा हा सलमान आगा होता. पाकिस्तान संघ वॉर्म अपसाठी फुटबॉल खेळत होता. त्यावेळी एका संघानं ६-० ची आघाडी घेतली. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडू हे ६-०... ६-०... असं ओरडत होते. त्यांनी ज्या ठिकाणी भारतीय पत्रकार बसले होते तिथं ही आरडाओरड सुरू केली होती.
दुसरीकडं पाकिस्तानचे माजी खेळाडू हे खेळ आणि राजकारण हे वेगवेगळं ठेवलं पाहिजे असं सांगत आहेत. मात्र मैदानावर पाकिस्तानी संघातील खेळाडू त्याच्या बरोबर उलट करताना दिसत आहेत.
पाकिस्तान संघाला यंदाच्या आशिया कपमध्ये भारताकडून सलग दोन पराभव सहन करावे लागले आहेत. जर पाकिस्तान आणि भारत दोन्ही संघ फायनलसाठी पात्र झाले तर पुन्हा एकदा त्यांची लढत होऊ शकते. त्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानच्या या कृतीचं उट्ट काढल्याशिवाय राहणार नाही.