Hardik Pandya shifts to Bengaluru : हार्दिक पंड्या हा मूळचा गुजरातच्या बडोद्याचा रहिवासी आहे, मात्र गेल्या दशकात त्याने आपला बहुतांश वेळ मुंबईत घालवला आहे. तो प्रामुख्याने आपली आयपीएल टीम 'मुंबई इंडियन्स'च्या घणसोली येथील सुविधेत सराव (ट्रेनिंग) करत असे. पण, मुंबईतील लोअर परेल येथील आपल्या घरापासून सरावासाठी रोज ये-जा करणे ही एक मोठी समस्या बनली होती. याच कारणामुळे हार्दिकला मुंबईबाहेर पडायचे होते.हार्दिक पंड्याने आपल्या उर्वरित करिअरसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) 'सेंटर ऑफ एक्सीलेंस' (CoE) ला आपले कायमस्वरूपी ट्रेनिंग सेंटर बनवण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी तो बंगळुरूमध्ये स्थायिक झाला आहे. असा निर्णय घेणारा तो भारतातील पहिला प्रमुख सक्रिय क्रिकेटपटू ठरला आहे.
हार्दिक पंड्या मूळचा गुजरातच्या बडोद्याचा असला, तरी गेल्या दशकात त्याने बहुतांश वेळ मुंबईतच घालवला आहे. सध्या मांडीच्या दुखापतीतून सावरत असलेला ३२ वर्षीय पंड्या ब्रिटनच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यातून बाहेर झाला होता. त्याने गेल्या सहा महिन्यांत सीओईमध्ये बराच वेळ घालवला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने 'पीटीआय'ला सांगितले की, "हार्दिक आधीच कायमचा बंगळुरूमध्ये शिफ्ट झाला आहे. त्याने शहराच्या बाहेरील भागात सीओई जवळ एक प्रॉपर्टी भाड्याने घेतली आहे. आपल्या उर्वरित करिअरसाठी सीओईला आपले कायमस्वरूपी ट्रेनिंग सेंटर बनवणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल."
"हार्दिकला मुंबईबाहेर जायचे होते कारण सरावासाठी रोज लोअर परेल येथील घरापासून ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. केंद्रीय मानधनप्राप्त क्रिकेटपटू असल्याने त्याला सीओईमध्ये दुखापतीच्या उपचारांपासून ते कौशल्य वाढवण्याच्या सरावापर्यंत सर्व सुविधा मिळतील. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो आयपीएल, राज्य संघ किंवा राष्ट्रीय संघासोबत नसेल, तेव्हा त्याने सीओईला आपला कायमचा बेस बनवण्याचा निर्णय घेतला आहे."
सूत्राने सांगितले की , हार्दिककडे त्याचे स्वतःचे फिजिओथेरपिस्ट आणि वैयक्तिक स्ट्रेंथ व कंडिशनिंग कोच देखील असतील, जे त्याला सीओईच्या बाहेर सराव करण्यासाठी मदत करतील. तो जोपर्यंत भारतासाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत आहे, तोपर्यंत त्याचे बंगळुरूमध्येच राहण्याचे नियोजन आहे. पुढील किमान पाच ते सहा वर्षे खेळण्याचा त्याचा निर्धार आहे."
पंड्याची दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्याने वैयक्तिक कामासाठी काही दिवसांची सुट्टी घेतली असून, तो एक-दोन दिवसांत सीओईमध्ये परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'रिटर्न टू प्ले' प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर त्याला तंदुरुस्त (फिट) घोषित केले तरी, ब्रिटन दौऱ्यानंतर लगेचच होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी त्याची निवड होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.