Hardik Pandya MI Captaincy
मुंबई : आयपीएल २०२६ हा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) अत्यंत निराशाजनक ठरला. गुणतालिकेत थेट नवव्या स्थानावर फेकल्या गेलेल्या मुंबईच्या या कामगिरीनंतर आता कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२५ च्या मोसमात तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईची यंदाची पीछेहाट चाहत्यांच्या आणि व्यवस्थापनाच्या पचनी पडलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कीरॉन पोलार्डने (Kieron Pollard) संघाच्या कामगिरीवर आणि हार्दिकच्या नेतृत्वावर रोकठोक भाष्य केले आहे.
रविवारी (दि. २४ मे) यंदाच्या हंगामातील अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून मुंबईला पराभव पत्करावा लागला. यानंतर पत्रकार परिषदेत पोलार्ड बोलताना हार्दिकला संघातून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात अपयश आलेच, शिवाय वैयक्तिक पातळीवर फलंदाजी आणि गोलंदाजीतही तो सपशेल फ्लॉप ठरला, अशी कबुली पोलार्डने दिली.
हार्दिकच्या नेतृत्वाबद्दल बोलताना पोलार्ड म्हणाला, "एक कर्णधार म्हणून हार्दिकला अपेक्षित कामगिरी झाली नाही. हे उघड आहे. मॅनेजमेंट म्हणून आम्हालाही अपेक्षित असलेला निकाल मिळाला नाही; पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की, त्याला संघाचे नेतृत्व करण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि प्रत्येक संधी दिली."हा केवळ एकाचा नाही तर संपूर्ण मुंबई इंडियन्स संघाचा सामूहिक पराभव असल्याचे पोलार्डने स्पष्ट केले.
"इथे बसून कोणीही एकमेकांवर बोट दाखवणार नाही. जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळात जय-पराजयाचा सामना करावाच लागतो, त्यामुळे मी काही गोष्टींवर प्रश्न उपस्थित करणार नाही. हार्दिकने प्रामाणिक प्रयत्न केले, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले;पण यश मिळाले नाही. आता आम्ही एकत्र बसून काय सर्वोत्तम आहे यावर चर्चा करू. पुढील १२ महिन्यांत आम्ही नक्कीच जोरदार पुनरागमन करू," असा विश्वास त्याने व्यक्त केला.
पुढील हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल संकेत पोलार्डने दिले, परंतु कोणताही घाईगडबडीत निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सीनियर खेळाडूंच्या भविष्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, "सध्या यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. अशा वेळी घेतलेले निर्णय हे भावनेच्या भरात घेतले जाऊ शकतात. प्रत्येकाला थोडा वेळ आणि स्पेस मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून कुठे चुका झाल्या याचे शांत डोक्याने विश्लेषण करता येईल. जबाबदार व्यवस्थापन म्हणून आम्ही घाईत कोणतेही विधान करणार नाही."
अखेरच्या सामन्यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्याच्या निर्णयाचे पोलार्डने समर्थन केले. तो म्हणाला, "जसप्रीत हा भारतीय क्रिकेटची अमूल्य संपत्ती आहे. आजचा सामना जिंकून आम्हाला केवळ २ गुण मिळाले असते, पण त्याने आमच्या अंतिम स्थानावर फारसा फरक पडला नसता. काहीवेळा खेळाडूची परिस्थिती समजून घ्यावी लागते. आमच्याकडे बेंच स्ट्रेंथ आहे आणि आम्ही तरुण खेळाडूंना संधी देत आहोत. त्यामुळे हा एक स्मार्ट निर्णय होता."