Hardik Pandya IPL Trade News: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याची कुणकुण ही आयपीएल २०२६ संपण्यापूर्वीच लागली होती. आता याबाबतच्या बातम्यांनी जोर धरला असून हार्दिक पांड्यासाठी शाहरूख खानची कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक असल्याची बातमी आहे. केकेआरला एका चांगल्या कर्णधाराची गरज असून ते हार्दिकमध्ये आपला कर्णधार पाहत आहेत. ते सध्या मुंबई इंडियन्ससोबत ट्रेडबाबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र या सर्व घडामोडीत राजस्थान रॉयल्सची देखील एन्ट्री झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केकेआरची टॉप मॅनेजमेंटच्या मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटसोबत अनेक चर्चांच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. पीटीआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याबाबतची डील ही ऑल कॅश डील किंवा ट्रेड ऑफ डील करणार आहे का याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मध्ये नवव्या स्थानावर राहिली होती. हार्दिक कर्णधार झाल्यापासून मुंबई इंडियन्सला तीन हंगामात फक्त एकदा प्ले ऑफ गाठता आलं आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'केकेआरसाठी अजिंक्य रहाणे हा एक काळजीवाहू कर्णधार आहे. तो या हंगामानंतर रिलीज केला जाईल. केकेआरच्या वरच्या मॅनेजमेंटने मुंबई इंडियन्सच्या मालकांशी हंगाम संपल्यानंतरच संपर्क केला असून आता रिलायन्सची वार्षिक बैठक होणार आहे. त्यामुळं सध्या त्यांची आयपीएल ट्रेड ही प्राथमिकता नाहीये.'
'असं असलं तरी केकेआरने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची संपर्क केला असून मुंबई इंडियन्सच्या टॉप लिडरशिपसोबत त्यांच्या चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
याचदरम्यान, राजस्थान रॉयल्सने देखील हार्दिक पांड्यामध्ये रस दाखवला असून त्यांनी देखील या चर्चांमध्ये उडी घेतली आहे. ते हार्दिकसाठी यशस्वी जैस्वालला मुंबईशी ट्रेड करू शकतात.
जर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्समध्ये जातो तर तो रियान परागकडून कॅप्टन्सी टेकओव्हर करू शकतो. जर हार्दिक पांड्याला आपल्या गोटात खेचण्यात केकेआरला यश आलं तरी हार्दिक तिथं देखील संघाचा कर्णधारच होऊ शकतो. अजिंक्य रहाणेनंतर रिंकू सिंह कर्णधारपदासाठी दावेदार आहे. मात्र तो अजून या रोलसाठी तयार नाहीये.
आयपीएल ट्रेड नियमाचा विचार केला खेळाडू थेट संघाशी वाटाघाटी करू शकत नाही. ऑल कॅश डील किंवा खेळाडूंची आदलाबदली याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त फ्रेंचायजींनाच असणार आहे.