स्पोर्ट्स

Gurindervir Singh: २ दिवसांत २ राष्ट्रीय विक्रम! गुरिंदरवीर सिंग बनला भारताचा सर्वात वेगवान धावपटू

पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने अवघ्या दोन दिवसांत पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत तब्बल दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला.

मोहन कारंडे

Gurindervir Singh 100m national record

रांची: भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासात रांची येथे खेळवल्या गेलेल्या फेडरेशन कप अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एक नवा सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने अवघ्या दोन दिवसांत पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत तब्बल दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीरने अवघ्या १०.०९ सेकंदांत अंतर पार करत '१०.१० सेकंदां'चा ऐतिहासिक टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय धावपटू ठरण्याचा बहुमान पटकावला. यासह तो सध्याचा 'भारतातील सर्वात वेगवान धावपटू' बनला आहे.

आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे तिकीट पक्के

२३ मे रोजी झालेल्या या ऐतिहासिक अंतिम फेरीत गुरिंदरवीरने ओडिशाच्या अनिमेश कुजूरचा विक्रम मोडीत काढत राष्ट्रीय विक्रमावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये अनिमेश कुजूर १०.२० सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर, तर प्रणव प्रमोद १०.२९ सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

गुरिंदरवीर विरुद्ध अनिमेश: रोमांचक जुगलबंदी

रांची येथील या स्पर्धेत गेल्या दोन दिवसांत राष्ट्रीय विक्रमासाठी गुरिंदरवीर आणि अनिमेश यांच्यात अभूतपूर्व चुरस पाहायला मिळाली. भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील ही सर्वात रोमांचक स्पर्धा मानली जात आहे.

२२ मे रोजी पहिल्या उपांत्य फेरीत गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत अनिमेश कुजूरचा १०.१८ सेकंदांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. मात्र, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या काही मिनिटांतच दुसऱ्या उपांत्य फेरीत अनिमेश कुजूरने १०.१५ सेकंदांची थरारक वेळ नोंदवत गुरिंदरवीरचा विक्रम मोडला आणि राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावे केला. या कामगिरीसह अनिमेशने राष्ट्रकुल स्पर्धेचे पात्रता निकष (१०.१६ सेकंद) पहिल्याच दिवशी पार केले, तर गुरिंदरवीर अवघ्या ०.०१ सेकंदाने मागे पडला.

उपांत्य फेरीत हुकलेली संधी गुरिंदरवीरने शनिवारी अंतिम फेरीत भरून काढली. त्याने १०.०९ सेकंदांची वादळी धाव घेत अनिमेशला मागे टाकले आणि १०.१० सेकंदांची ऐतिहासिक भिंत पाडणारा पहिला भारतीय अ‍ॅथलीट ठरला.

गुरिंदरवीर सिंग (प्रशिक्षक: जेम्स हिलियर) आणि अनिमेश कुजूर (प्रशिक्षक: मार्टिन ओवेन्स) यांच्यातील या लढतीने भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील १०० मीटर गटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भारतीय क्रीडा जगताला सुवर्णकाळ दाखवणारी ठरू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या १०.१० सेकंदांच्या टप्प्याची देश वाट पाहत होता, तो अडथळा रांचीच्या मैदानावर दोन दिवसांत अक्षरशः भुईसपाट झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT