स्पोर्ट्स

Asian Games : 1500 मीटर ट्रॅकवर गुलवीरचा झंझावात, शूटिंग रेंजवर ईशाचा दबदबा! भारताची 'रौप्य' भरारी

gulveer singh isha singh silver medals : ईशा सिंगची थरारक लढत; अनेक 'शूट-ऑफ'नंतर रौप्यपदक

रणजित गायकवाड

नागोया (जपान) : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या क्रीडापटूंनी सोमवारी (दि. २८) लक्षवेधी कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली. लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग याने ट्रॅकवर आपला झंझावात कायम ठेवत १५०० मीटर शर्यतीत रौप्य पटकावले, तर नेमबाजीच्या अत्यंत थरारक अंतिम फेरीत अनेक 'शूट-ऑफ'चा यशस्वी सामना करत स्टार नेमबाज ईशा सिंगने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

गुलवीर सिंगचे दमदार दुहेरी रौप्य

पुरुषांच्या १५०० मीटर धावण्याच्या चुरशीच्या अंतिम फेरीत गुलवीर सिंगने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत दिमाखदार रौप्यपदक पटकावले. शर्यतीदरम्यान बहुतांश वेळ आघाडीवर राहून त्याने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला होता. मात्र, अखेरच्या क्षणांमध्ये जपानच्या काझुतो इइझावाने मुसंडी मारत ३ मिनिटे ३६.३५ सेकंदांच्या नव्या आशियाई क्रीडा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. गुलवीरने निकराची झुंज देत दुसरे स्थान पटकावून रौप्यपदक निश्चित केले. जपानच्याच नागिया मोरीने ३ मिनिटे ३७.९२ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. या शर्यतीत अंतिम फेरीत सहभागी झालेला भारताचा दुसरा धावपटू युनूस शाह ३ मिनिटे ४३.८८ सेकंदांच्या वेळेसह नवव्या स्थानावर राहिला.

चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगचे हे दुसरे पदक ठरले आहे. यापूर्वी त्याने १०,००० मीटर शर्यतीतही चमकदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले होते. मागील हांगझोऊ आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या गुलवीरने यंदा आपल्या पदकाचा रंग बदलत उत्कृष्ट प्रगती साधली आहे. चालू वर्षात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने ५,००० मीटरमध्ये कांस्य आणि १०,००० मीटरमध्ये रौप्य अशी दोन पदके जिंकली होती. या ताज्या यशासह भारताने ॲथलेटिक्समधील पदकांची एकूण संख्या १५ वर नेली असून, त्यात ७ रौप्य आणि ८ कांस्यपदकांचा समावेश आहे.

ईशा सिंगची थरारक लढत; अनेक 'शूट-ऑफ'नंतर रौप्यपदक

दुसरीकडे, नेमबाजीच्या रेंजवर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी व जागतिक विक्रमवीर असलेल्या ईशा सिंगने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अंतिम फेरीत रौप्यपदकाला गवसणी घातली. ईशाचा पदकापर्यंतचा प्रवास प्रचंड नाट्यमय ठरला. अंतिम फेरीत तिने आणि चीनच्या शाओ जियारुईझुआन (Xiao Jiaruixuan) या दोघींनीही प्रत्येकी ३८ अचूक हिट्सची बरोबरी साधली होती.

यापूर्वीच्या बाद फेरीत ईशाने दक्षिण कोरियाच्या किम ह्यॉन सुकविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीसाठी तब्बल तीन शूट-ऑफचा यशस्वी सामना करत आपले पदक पक्के केले होते. त्यानंतर सुवर्ण आणि रौप्यपदकाच्या अंतिम निकालासाठी ईशाला पुन्हा चीनच्या शाओविरुद्ध दोन शूट-ऑफ लढावे लागले. या अत्यंत अटीतटीच्या शूट-ऑफमध्ये शाओने (४+३) गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर ईशाला (४+२) गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

ईशाने अंतिम फेरीची सुरुवात अतिशय आक्रमकपणे करत पहिल्या तीन सीरिजमध्ये अनुक्रमे ५, ४ आणि ३ अशा गुणांची कमाई केली. त्यानंतर उर्वरित सात मालिकांमध्ये तिने अनुक्रमे ४, ४, ३, ३, ५, ३ आणि ४ असे अचूक निशाणे साधत वर्चस्व राखले. २०२३ च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारात रौप्य आणि सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकणाऱ्या ईशाने यंदाही आपली वैयक्तिक पदकाची परंपरा कायम राखली आहे. चालू स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात भारतीय संघ पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे ईशाचे पदक हुकले होते; मात्र वैयक्तिक प्रकारात तिने हा पराभव मागे टाकत दिमाखदार पुनरागमन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT