Gautam Gambhir Sreesanth fight : गौतम गंभीरबरोबर झालेल्‍या वादावर माजी क्रिकेटपटू श्रीसंतने धक्‍कादायक खुलासा केला आहे.  Pudhari
स्पोर्ट्स

Gambhir vs Sreesanth : "गौतम गंभीरने 'देशद्रोही' म्हटले, शिवीगाळही केली"; 'त्‍या' वादावर श्रीसंतचा धक्कादायक खुलासा

Gambhir vs Sreesanth cricket row : बाउन्सर टाकल्यानंतर गंभीरने संतापल्‍याचाही दावा

पुढारी वृत्तसेवा

Gambhir vs Sreesanth cricket row : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने डिसेंबर २०२३ मधील 'लेजेंड्स लीग क्रिकेट' (LLC) सामन्यादरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि आपला माजी सहकारी गौतम गंभीरसोबत झालेल्या वादाबद्दल सविस्तर खुलासा केला आहे. यापूर्वी, गंभीरने आपल्याला "फिक्सर" (सामने फिक्स करणारा) म्हटल्याचा दावा श्रीसंतने केला होता. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रीसंतने या वादावर अधिक भाष्य केले असून गंभीरने आपल्याला 'देशद्रोही' देखील म्हटले होते, असा नवा दावा केला आहे.

तो एक खूप चांगला क्रिकेटपटू...

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत आपला अनुभव सांगताना श्रीसंत म्हणाला, "गौतीने (गंभीर) पहिल्याच चेंडूवर पुढे येत फ्लिक शॉट मारला, कारण त्याला माझा गेम माहीत आहे आणि तो एक खूप चांगला क्रिकेटपटू आहे. त्याच्या कोचिंगबद्दल मला माहीत नाही, पण खेळाडू म्हणून तो उत्तम आहे. म्हणूनच, मी त्याला पुढचा चेंडू बाउन्सर टाकला.

त्याने मला उघडपणे शिवीगाळ केली

बाउन्सर टाकल्‍यानंतर गंभीर म्हणाला की, 'मी तुला विकत घेऊ शकतो'. त्याने मला उघडपणे शिवीगाळ केली. जे बोलायला नको होते ते तो बोलला, त्याने मला 'फिक्सर' म्हटले," मी पुढे होऊन त्याला विचारले, 'गौती भाई, तुम्ही ठीक आहात ना?' कारण माझी शरीरयष्टी मोठी असल्याने मी त्याला मारणार की काय, असे वाटत होते. तेव्हा त्‍याने शिवीगाळही केली. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मला 'फिक्सर' आणि 'देशद्रोही' म्हटले."

गंभीर-श्रीसंतमधील संबंध कमालीचे ताणले

गंभीर आणि श्रीसंत हे दोघेही भारताच्या २००७ मधील टी-२० विश्वचषक आणि २०११ मधील एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. मात्र, खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असल्याचे दिसून येत आहे.

श्रीसंतवर झाले होते स्पॉट-फिक्सिंगचे आरोप

२०१३ च्या आयपीएल दरम्यान श्रीसंतवर स्पॉट-फिक्सिंगचे आरोप झाले होते आणि त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. गंभीरने याच पार्श्वभूमीवर या कमेंट्स केल्याचे समजते. सुरुवातीला श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती, परंतु नंतर बीसीसीआयने (BCCI) ही बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली. २०२० मध्ये श्रीसंतला पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली होती. गौतम गंभीर सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने यापूर्वीच 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५' आणि 'टी-२० विश्वचषक २०२६' या दोन्ही स्पर्धांवर आपले नाव कोरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT