स्पोर्ट्स

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरवर साडेतीन वर्षांची बंदी

Shambhuraj Pachindre

दुबई : वृत्तसंस्था

स्पॉट फिक्सिंगची माहिती उशिरा दिल्याबद्दल झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलर याच्यावर आयसीसीने बंदी घातली आहे. आता तो पुढच्या साडेतीन वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभाग घेऊ शकणार नाही. टेलरने सोशल मीडियाच्या माध्यमांतून काही वर्षांपूर्वी झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली होती.

परंतु, आयसीसीच्या मते, ही माहिती देण्यासाठी टेलरने जास्त उशीर केला आहे आणि याच कारणास्तव त्याच्यावर ही कारवाई केली गेली आहे. शुक्रवारपासून त्याच्यावर ही बंदी लावली गेली आहे.आयसीसीने टेलरविषयी त्यांच्या घेतलेल्या निर्णयात सांगितले आहे की, 'त्याने अँटी करप्शन युनिट कोड चारवेळा तोडला आहे. यामध्ये फक्त उशिरा माहिती देणेच नाही, तर त्याने भेटवस्तू आणि रोख रक्कम घेतली.

टेलरने सांगितले होते की, ऑक्टोबर 2019 मध्ये स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी एका भारतीय व्यक्तीने त्याच्याशी संपर्क केला होता. या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती स्वतः टेलरने त्याच्या ट्विटर पोस्टमधून दिली; पण तरीही त्याला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
टेलरने सांगितल्याप्रमाणे एका भारतीय व्यावसायिकाने त्याला स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी धमकावले होते. या भारतीय व्यक्तीला भेटल्यानंतर तो भ्रमात होता आणि अमली पदार्थही सेवन केले होते.

त्या भारतीय व्यावसायिकाने त्यावेळी कोकेन घेताना टेलरचा व्हिडीओ बनवला होता आणि त्याच्या जोरावर स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी धमकी दिली होती. परंतु, त्याने फिक्सिंग करण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता आणि पुन्हा कधीच त्या व्यक्तीशी चर्चा झाली नाही.

टेलरने पोस्टमध्ये लिहिले की, 'मी काहीही करू शकतो; पण विश्वासघात नाही करू शकत. क्रिकेटविषयीचे त्याचे प्रेम त्याच्या वाटेत येणार्‍या कोणत्याही अडथळ्यांपेक्षा जास्त आहे. मला आशा आहे की माझा अनुभव अनेक क्रिकेटपटूंना हिंमत देईल आणि असे काही करण्याआधी विचार करायला भाग पाडेल. आशा आहे की, ते अशाप्रकारच्या घटना लवकरात लवकर आयसीसीला सांगतील.'

SCROLL FOR NEXT