former Indian cricketer Dilip Doshi passes away
मुंबई : भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. १९४७ मध्ये जन्मलेल्या दोशी यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दोशी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर एक यशस्वी हिंदी समालोचक म्हणूनही खूप लोकप्रिय होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८९८ बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३ वेळा पाच बळी घेतले. एका सामन्यात सहा वेळा १० बळी घेण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या निधनावर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, ते आपल्या मागे कौशल्य, वचनबद्धता आणि उत्कृष्टतेचा समृद्ध वारसा सोडून गेले आहेत. अलीकडेच बीसीसीआयने एका समारंभात दोशी यांचा सन्मानही केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही ते उपस्थित होते.
डावखुरे फिरकी गोलंदाज दोशी यांचे निधन हृदयविकारामुळे झाले. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, दोशी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्येच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नयन इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये सरे आणि महाराष्ट्राच्या सौराष्ट्र संघाकडून खेळला आहे.
१९७० च्या दशकात वयाच्या ३२ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिलीप दोशी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांनी १९८० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. दोशी यांनी आपल्या 'स्पिन पंच' या आत्मचरित्रात आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सविस्तर लिहिले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८९८ बळी घेणाऱ्या दोशी यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३ वेळा पाच बळी घेतले. एका सामन्यात सहा वेळा १० बळी घेण्याचा पराक्रम केला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोशी यांचा फोटो शेअर करून निधनाची माहिती दिली. बोर्डाने म्हटले की, 'बीसीसीआय माजी भारतीय फिरकीपटू दिलीप दोशी यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करत आहे. त्यांचे लंडनमध्ये निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'
३३ कसोटी सामन्यांमध्ये ११४ बळी घेणारे दोशी किती यशस्वी फिरकी गोलंदाज होते, याचा अंदाज यावरून लावता येतो की त्यांनी सहा वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रमही केला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्येही दोशी अत्यंत किफायती गोलंदाज ठरले. त्यांनी १५ सामन्यांमध्ये केवळ ३.९६ च्या इकॉनॉमी रेटने २२ बळी घेतले.
भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त, दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांनी सौराष्ट्र आणि बंगाल संघाकडूनही क्रिकेट खेळले. याशिवाय, परदेशी कौंटी क्रिकेटमध्ये दोशी यांनी वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.
सचिन तेंडुलकरनेही दिलीप दोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 'मी १९९० मध्ये युकेमध्ये दिलीपभाईंना पहिल्यांदा भेटलो आणि त्या दौऱ्यात त्यांनी मला नेटमध्ये गोलंदाजी केली. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि मी त्यांच्या भावनांना प्रतिसादही दिला. दिलीपभाईंसारख्या उबदार मनाच्या व्यक्तीची खूप आठवण येईल. आम्ही नेहमीच क्रिकेटशी संबंधित जी संभाषणे करायचो ती मला खूप आठवतील.'