

हेडिंग्ले : हेडिंग्लेतील पहिला कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला असून, सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशीदेखील काहीच चित्र स्पष्ट नव्हते. एकीकडे हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 371 धावांचे टार्गेट असताना त्यांनी दिवसअखेर बिनबाद 21 अशी सावध सुरुवात केली. दुसरीकडे भारताला या सामन्यात विजय खेचून आणण्यासाठी 10 विकेटस् काबिज करावे लागतील. शेवटच्या दिवशी या रोमांचक लढतीत अगदी चारही निकाल शक्य आहेत. ज्याप्रमाणे भारत किंवा इंग्लंड यांच्यापैकी एक संघ येथे बाजी मारू शकतो, त्याचप्रमाणे ही लढत अनिर्णीत राहू शकते किंवा रोमांचक टायसुद्धा अनुभवास येऊ शकतो. कसोटीचे अभिजात सौंदर्य त्याची नजाकत या लढतीच्या निमित्ताने क्रिकेटला आणखी एका नव्या उंचीवर नेत असेल, तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही.
या लढतीत के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दुसर्या डावात 364 धावांची मजल मारत इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवलेे. प्रत्युत्तरात इंग्लंडने सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 21 अशी सुरुवात केली. तत्पूर्वी, राहुल आणि पंत यांच्यातील चौथ्या गड्यासाठी झालेल्या 195 धावांच्या भागीदारीमुळेच भारताला सर्वबाद 364 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताचे शेवटचे 6 फलंदाज तर अवघ्या 31 धावांत बाद झाले. चौथ्या दिवसाची सुरुवात भारताने दोन बाद 90 धावांपासून केली; पण दिवसाच्या सुरुवातीलाच कर्णधार शुभमन गिलच्या रूपाने भारताला धक्का बसला. त्यानंतर राहुल आणि पंत यांनी संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ साधत इंग्लंडच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. चहापानापूर्वी पंत 118 धावा करून तंबूत परतला होता.
भारत पहिला डाव स्कोअर सर्वबाद 471 षटके : 113 अवांतर : 31
इंग्लंड पहिला डाव
स्कोअर सर्वबाद 465 षटके : 100.4 अवांतर : 34
भारत दुसरा डाव
स्कोअर सर्वबाद 364 षटके : 96 अवांतर : 18