FIFA World Cup Black Magic: फिफा वर्ल्ड कप २०२६ (FIFA World Cup 2026) मध्ये क्रोएशियाला ४-२ ने धूळ चारणाऱ्या इंग्लंड फुटबॉल संघाची जादू घानाविरुद्ध फिकी पडल्याचे पाहायला मिळाले. तुलनेने कमकुवत असलेल्या घानाच्या संघाने इंग्लंडला गोलरहित बरोबरीत रोखले. मात्र, या सामन्यानंतर घानाचा एक तांत्रिक नाना क्वाकू बोनसम (Nana Kwaku Bonsam) याने केलेला दावा सध्या क्रीडा जगतात प्रचंड चर्चेत आला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनवर (Harry Kane) आपली काळी जादू चालल्याचा दावा या तांत्रिकाने केला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये हॅरी केनला गोल करण्याची एक अतिशय सोपी संधी मिळाली होती. इंग्लंडला आघाडी मिळवून देण्याची सुवर्णसंधी असताना केनने मारलेला शॉट थेट नेटच्या वरून गेला. केनसारख्या दिग्गज खेळाडूने हा सोपा गोल मिस केल्याने सर्वच थक्क झाले.
सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये केनकडून चूक झाल्यानंतर स्टेडियममधील एका इंग्लिश चाहत्याने घानाच्या समर्थकाला गमतीने विचारले, "अरे, तुमची जादू काम करतेय वाटतं!" त्यावर घानाच्या समर्थकाने उत्तर दिले, "मित्रा, यात कोणतीही जादू नाही, केनला फक्त चांगल्या शूटिंग सरावाची गरज आहे."
दुसरीकडे, घानाचा तांत्रिक बोनसम याने 'डेली स्टार'शी बोलताना केनवर काळी जादू केल्याचा उघड दावा केला. बोनसम सामन्यापूर्वीच म्हणाला होता, "मी हॅरी केनवर काम करत आहे. मी काय करू शकतो हे याआधीही दाखवून दिले आहे. त्याला रोखण्यासाठी मला काय करावे लागेल हे मला माहित आहे. मला त्याला कोणतीही गंभीर दुखापत करायची नाही, पण माझ्या देशाविरुद्ध तो चांगली कामगिरी करू शकणार नाही, इतकं मी नक्की करेन."
विशेष म्हणजे, २०१४ च्या वर्ल्ड कपदरम्यान पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) गुडघ्याला झालेल्या दुखापतीमागेही आपलाच हात असल्याचा दावा याच तांत्रिकाने केला होता.
या सामन्यात इंग्लंडचा दबदबा पाहायला मिळाला. इंग्लंडने गोल करण्यासाठी तब्बल १९ शॉट्स मारले, तर घानाला केवळ १ शॉट मारता आला. मात्र, गोलच्या सोप्या संधीचे रूपांतर गुणांमध्ये न करता आल्यामुळे इंग्लंडला या बरोबरीवर समाधान मानावे लागले.
वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडचा संघ आफ्रिकेतील कोणत्याही देशाकडून कधीही हरलेला नाही, हा रेकॉर्ड यंदाही कायम राहिला. या ड्रॉ सामन्यानंतर इंग्लंड आणि घाना या दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण झाले आहेत. मात्र, चांगल्या गोल फरकामुळे इंग्लंड गुणतालिकेत अव्वल स्थानांवर आहे, तर ३ गुणांसह क्रोएशिया तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा पुढील सामना शनिवारी न्यू जर्सी येथे पनामाविरुद्ध होणार आहे, तर घानाचा संघ फिलाडेल्फिया येथे क्रोएशियाशी भिडणार आहे.