FIFA World Cup Final  AI-generated image
स्पोर्ट्स

FIFA World Cup Final : ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं! 'मित्रा'चा अंधविश्वास नडला, आता 'विरोधका'चे करावे लागणार 'लाड'

स्टेडियमच्या VIP बॉक्समध्ये 'जागतिक राजकारण'चा रंगणार वेगळाच सामना

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup Final 2026 : रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री न्यूयॉर्कचे मेटलाईफ स्टेडियम केवळ फुटबॉल इतिहासातील महायुद्धाचे साक्षीदार बनणार नाही, तर जागतिक राजकारणातील एका अजब ड्रामाचे केंद्र ठरणार आहे. एका बाजूला मैदानावर स्पेन आणि अर्जेंटिनाचे फुटबॉलवीर फिफा वर्ल्डकपच्या चमचमत्या ट्रॉफीसाठी आमनेसामने असतील, तर दुसरीकडे स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये 'जिओ-पॉलिटिक्स'चा एक वेगळाच सामना रंगणार आहे.

ट्रम्‍प यांना करावे लागणार कट्टर 'विरोधक' नेत्‍याचे स्‍वागत

या महामुकाबल्यात यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अशा एका नेत्याचे स्वागत करावे लागणार आहे, जे जागतिक पातळीवर त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. दुसरीकडे, नशिबाचा खेळ असा की, ट्रम्प यांचा जगातील सर्वात पक्का मित्र मात्र एका अजब अंधविश्वासामुळे या ऐतिहासिक क्षणी न्यूयॉर्कला येण्याऐवजी घरातच बसून राहणार आहे.

ट्रम्प यांच्या समोर असणार कट्टर विरोधक

स्पेनच्या संघाने फायनलमध्ये धडक मारल्यामुळे आपल्या संघाचा हुरूप वाढवण्यासाठी स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज स्वतः न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत स्पेनचे राजे फिलिप सहावे, राणी लेतिझिया आणि त्यांच्या मुलीही उपस्थित राहतील. खेळाच्या दृष्टीने ही सामान्य गोष्ट असली, तरी राजकारणाच्या चष्म्यातून ही परिस्थिती अत्यंत तणावाची आहे.

ट्रम्प आणि सांचेज यांच्यातील वाद जगजाहीर

पेद्रो सांचेज हे ट्रम्प यांच्या धोरणांचे जाहीर वाभाडे काढण्यासाठी ओळखले जातात. इराणवरील अमेरिकेची भूमिका असो, गाझामधील इस्रायलच्या कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा असो, की नाटो (NATO) च्या खर्चाचा वाद, दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी स्पेनला आर्थिक निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. आता ज्‍यांच्‍याशी वैचारिक वैर आहे त्यांचेच आदरातिथ्य ट्रम्प यांना करावे लागणार आहे. जर स्पेन अंतिम सामना जिंकला तर ट्रम्प यांना स्वतःच्या हाताने सांचेज यांच्यासमोर त्यांच्या संघाला ट्रॉफी सुपूर्द करावी लागेल.

अर्जेंटिनाचे राष्‍ट्राध्‍यक्ष मिलेई ट्रम्प यांचे 'फॅन' तरीही फायनलपासून दूर का?

स्टेडियमच्या व्हीआयपी गॅलरीमध्ये एक महत्त्वाची खुर्ची रिकामी असणार आहे, ती म्हणजे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेविएर मिलेई यांची. मिलेई हे डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात मोठे प्रशंसक आणि पक्के मित्र मानले जातात. मिलेई आले असते तर ट्रम्प यांचा आनंद गगनात मावला नसता, पण मिलेई यांनी न्यूयॉर्कला येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या न येण्यामागे कोणतेही राजनैतिक कारण नसून फुटबॉलबाबत असलेला एक अजब अंधविश्वास (ज्याला अर्जेंटिनामध्ये 'काबालस' - Cabalas म्हणतात) कारणीभूत आहे.

मिलेई यांच्‍या लकी खुर्चीचा फॉर्म्युला

मिलेई यांचे मानणे आहे की, त्यांनी घरातून मॅच पाहणे अर्जेंटिनासाठी 'लकी चार्म' ठरत आहे. अर्जेंटिनाने या वर्ल्डकपमध्ये जिंकलेले सर्व ७ सामने मिलेई यांनी त्यांच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमधील (ओलीवोस निवास) एकाच विशिष्ट खुर्चीवर बसून पाहिले आहेत. स्टेडियममध्ये गेल्यावर हा 'टोटका' मोडेल आणि संघारेल, अशी भीती त्यांना वाटत आहे.

'लकी जॅकेट'चा किस्सा

मिलेई यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी एक जाड जॅकेट घातले होते. मॅचदरम्यान जेव्हा त्यांनी ते जॅकेट काढले, तेव्हा समोरच्या संघाने लगेच गोल केला. त्यानंतर घाबरून त्यांनी पुन्हा जॅकेट घातले आणि तेव्हापासून ते मॅच संपेपर्यंत जॅकेट अंगावरून काढत नाहीत!

अर्जेंटिनामध्ये राष्ट्रपतींना मानतात 'अपशकुनी'?

अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये हा अंधविश्वास खूप जुना आहे. १९९० च्या वर्ल्डकपमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते, आणि अर्जेंटिनाचा संघ कॅमेरूनकडून पहिलाच सामना हरला. तेव्हापासून तिथल्या जनतेने त्यांना 'मुफा' (म्हणजेच अपशकुनी किंवा पनौती) म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर एकही राष्ट्राध्यक्ष स्टेडियममध्ये सामना पाहायला गेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT