Richest Footballers 2026: FIFA World Cup 2026 मुळे जगभरात फुटबॉलचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मैदानावर आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकणारे स्टार फुटबॉलपटू कमाईच्या बाबतीतही अव्वल आहेत. आज हे खेळाडू केवळ क्लबकडून मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून नाहीत, तर जाहिराती, स्वतःचे व्यवसाय, गुंतवणूक आणि ब्रँडमधून कोट्यवधी डॉलर्सची कमाई करत आहेत.
पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू मानला जातो. सौदी अरेबियातील अल नास्र क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोची एकूण संपत्ती 1.2 ते 1.4 अब्ज डॉलर्स (भारतीय चलनात 1 लाख कोटी रुपयांहून अधिक) असल्याचा अंदाज आहे.
रोनाल्डोला फुटबॉलमधील मानधनाव्यतिरिक्त Nike सोबतचा लाइफटाइम करार, हॉटेल व्यवसाय, जिम चेन, रिअल इस्टेट आणि इतर गुंतवणुकीतून मोठी कमाई होते.
अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा लिओनेल मेस्सी हा कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंटर मियामी क्लबकडून खेळणाऱ्या मेस्सीची एकूण संपत्ती सुमारे 850 दशलक्ष डॉलर्स असल्याचे मानले जाते.
क्लब करार, Adidas सोबतची भागीदारी, हॉटेल व्यवसाय आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक हे त्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत.
ब्राझीलचा स्टार नेमार सौदी प्रो लीगमधील अल हिलाल क्लबमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. त्याची संपत्ती 450 ते 500 दशलक्ष डॉलर्स दरम्यान असल्याचा अंदाज आहे. Puma, Red Bull आणि गेमिंग कंपन्यांसोबतच्या करारांमुळे त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
फ्रान्सचा युवा स्टार किलियन एमबापे रिअल माद्रिदमध्ये दाखल झाल्यानंतर जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गणला जात आहे. विविध अंदाजानुसार त्याची संपत्ती 250 ते 700 दशलक्ष डॉलर्स दरम्यान आहे. क्लबचे मानधन, साइनिंग बोनस आणि Nike, Hublot यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती त्याच्या कमाईचे प्रमुख स्रोत आहेत.
इजिप्तचा मोहम्मद सलाह याच्याकडे सुमारे 140 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असून तो आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये गणला जातो. इंग्लंडचा हॅरी केन याच्याकडेही जवळपास 140 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे.
मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केविन डी ब्रुईन याची संपत्ती सुमारे 130 दशलक्ष डॉलर्स, तर त्याच क्लबचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालंड याची संपत्ती सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स आहे.
याशिवाय, दक्षिण कोरियाचा सोन ह्युंग-मिन आणि सेनेगलचा सादियो माने यांच्याकडे प्रत्येकी सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे. रिअल माद्रिदचा युवा स्टार विनिसियस ज्युनिअर याच्याकडे सुमारे 80 दशलक्ष डॉलर्स, तर अनुभवी मिडफिल्डर लुका मॉड्रिच याच्याकडे सुमारे 75 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असल्याचे मानले जाते.
आजचे आघाडीचे फुटबॉलपटू केवळ मैदानावरील कामगिरीमुळेच नव्हे, तर ब्रँड व्हॅल्यू, जाहिराती, व्यवसाय आणि गुंतवणुकीमुळेही जागतिक आर्थिक साम्राज्य उभे करत आहेत. त्यामुळे ते केवळ क्रीडा क्षेत्रातील सुपरस्टार नसून जगातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींमध्येही त्यांची गणना केली जाते.