FIFA World Cup 2026 Controversies : संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस उरले असतानाच, ही स्पर्धा अनेक वादांच्या भोवर्यात अडकला आहे. सुरुवातीला तिकीट विक्री आणि नियोजनातील त्रुटीं पुरता मर्यादित असलेला हा घोळ आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. विमानतळांवर फुटबॉलपटू आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना तासनतास ताब्यात घेतले जात आहे, एका मुख्य अधिकार्याला तर अमेरिकेत प्रवेश देण्यासच नकार देण्यात आला आहे. यात आफ्रिकेतील सर्वोत्तम फुटबॉल रेफरी ओमर अब्दुलकादीर आर्टन यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. सोमालियाच्या या अधिकार्याला मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकन अधिकार्यांनी परत पाठवले आणि इस्तंबूलच्या विमानाने थेट रवाना केले. अमेरिकेच्या या निर्णयामुळे संपूर्ण फुटबॉल जगतात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळणे हे एका उत्सवासारखे असते. तब्बल एक महिना चालणारी ही स्पर्धा जगभरातील खेळाडू, अधिकारी आणि चाहत्यांनी एकत्र येणे अपेक्षित असते. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच २०२६ चा विश्वचषक वादाच्या गर्तेत सापडला आहे. रेफरींची हकालपट्टी, विमानतळावर खेळाडूंना ताब्यात घेणे, व्हिसा वाद, तिकिटांचा काळाबाजार आणि चाहत्यांचे आर्थिक नुकसान... या सर्व गोष्टींमुळे सध्या फुटबॉल सोडून इतर सर्वच विषयांची चर्चा रंगत आहे.
रेफरीची अशा प्रकारे हकालपट्टी करण्याच्या या निर्णयामुळे फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसला आहे; कारण आर्टन हे 'डिप्लोमॅटिक' (राजनैतिक) पासपोर्टवर प्रवास करत होते. सुरुवातीच्या विलंबांनंतर सोमालियाच्या दूतावासाने त्यांना व्व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली होती, परंतु तरीही अमेरिकेच्या सीमा सुरक्षा दलाने अखेर त्यांना देशात प्रवेश नाकारला.
या घटनेनंतर सोमालियाच्या पंतप्रधानांनी जाहीर पत्रक काढून अमेरिकन प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान हसन अली खैरे म्हणाले, "आफ्रिकेतील सर्वात उत्कृष्ट आणि जगातील सर्वोत्तम रेफरींपैकी एक असलेले ओमर आर्टन हे व्हिसा घोळामुळे फिफा विश्वचषकात रेफरी म्हणून काम करू शकणार नाहीत, हे अत्यंत निराशाजनक आहे."
पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या संघर्षाचे पडसाद हे फुटबॉल जगतावरही झाला आहे. ७ जून रोजी, इराकचा उपकर्णधार आणि देशाचा स्टार स्ट्रायकर आयमेन हुसेन याला विमानतळावर तब्बल सात तास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. सेन हा इराकचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे, ज्याच्या गोलमुळे इराकने या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मानतळावरील या छळाला केवळ हुसेनलाच सामोरे जावे लागले नाही, तर त्याच्यासोबत संघातील आणखी एका फुटबॉलपटूला आणि संघाच्या अधिकृत फोटोग्राफरलाही चौकशीसाठी रोखून धरण्यात आले होते. अखेर हुसेनला अमेरिकेत प्रवेश देण्यात आला, पण संघाच्या फोटोग्राफरला मात्र अमेरिकेत येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या संपूर्ण वादाची सुरुवात झाली ती १२ मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानामुळे. . अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचलेला असताना, ट्रम्प यांनी इराणच्या राष्ट्रीय संघाला या स्पर्धेत सहभागी होऊ द्यावे की नाही, असा जाहीर प्रश्न उपस्थित केला होता. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे विश्वचषकात स्वागत आहे; परंतु त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी येथे असणे योग्य आहे असे मला वाटत नाही. या बाबीकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!" इराणने यावर चिंता व्यक्त केली असली, तरी फिफा ने इराणचे सामने अमेरिकेबाहेर हलवण्याची विनंती फेटाळून लावली आहे.
व्हिसाचा फटका इराणच्या फुटबॉल संघालाही बसला आहे. इराणच्या खेळाडूंना त्यांच्या पहिल्या सामन्याच्या अवघ्या १० दिवस आधी व्हिसा देण्यात आला. यामुळे आता अमेरिकेतील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी मिळणारा महत्त्वाचा वेळ गमवावा लागला आहे. इराणच्या फुटबॉल फेडरेशननुसार, त्यांच्या संघातील "मुख्य व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय सदस्यांसह" अनेक जणांना व्हिसा नाकारण्यात आला. फेडरेशनने अमेरिकेवर यजमानपदाच्या कर्तव्यांचे उल्लंघन केल्याचा आणि फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा थेट आरोप केला आहे.
एकीकडे अमेरिका व्हिसा आणि स्थलांतराच्या वादाशी झगडत असताना, फिफाने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना नाराज करण्याची स्वतःची वेगळी पद्धत शोधून काढली आहे. युरोपमधील फुटबॉल चाहत्यांच्या संघटनांनी मार्च महिन्यात फिफाच्या तिकिटांच्या दरांवरून थेट 'युरोपियन कमिशन'कडे अधिकृत तक्रार नोंदवली. फिफा आपल्या मक्तेदारीचा गैरफायदा घेऊन चाहत्यांवर अवाजवी तिकीट दर लादत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. साखळी सामन्यातील सर्वात स्वस्त तिकिटांची किंमत $१४० (अंदाजे १३,००० रुपये) पासून ते थेट अंतिम सामन्यासाठी (Final) $८,६८० (अंदाजे ८.३ लाख रुपये) पर्यंत ठेवण्यात आली आहे. फिफाने केलेली ही मोठी फसवणूक असल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे.
अलिकडच्या काळातील हा पहिलाच असा फुटबॉल विश्वचषक आहे, ज्यामध्ये फिफाने स्पर्धेच्या काही वर्षे आधी तिकीट विक्रीची प्रक्रिया जाहीर केली नाही. सप्टेंबर २०२५ पर्यंत फिफाने तिकीट विक्री कशी होणार याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिली नव्हती. याउलट, २०१८ च्या विश्वचषकादरम्यान फिफाने तिकीट दर आणि बुकिंगची प्रक्रिया तब्बल दोन वर्षे आधीच जाहीर केली होती. आणि जेव्हा तिकिटे उपलब्ध झाली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. यावेळचे दर कतारमधील मागील विश्वचषकापेक्षा कित्येक पटीने जास्त होते.फिफाने 'डायनॅमिक प्राइसिंग' (Dynamic Pricing) धोरण लागू केले. याचा अर्थ असा की, जशी मागणी वाढेल आणि स्पर्धा जवळ येईल, तसे तिकिटांचे दर आणखी वाढत जाणार आहेत.
अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सर्वसामान्यांसाठी तिकीट खरेदी करणे म्हणजे एक मोठा मनस्ताप ठरला आहे. चाहत्यांना डिजिटल क्यूमध्ये तासनतास थांबावे लागत आहे, आणि अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे त्यांना थेट लाईनच्या मागे ढकलले जात आहे.तिकीट काळाबाजार करणाऱ्यांना आळा बसेल अशी आशा असणारी ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली. अमेरिकेत तिकिटांच्या पुनर्विक्रीची (Resale) बाजारपेठ तुलनेने अनियंत्रित आहे आणि फिफाने याचाच फायदा उठवला.या काळ्याबाजाराला आळा घालण्याऐवजी फिफाने स्वतःचेच एक अधिकृत व्यासपीठ (Platform) तयार केले, जिथे आधीच तिकीट खरेदी केलेले लोक ते महागड्या दराने पुन्हा विकू शकतात. फिफाने या पुनर्विक्रीच्या किमतीवर कोणतीही मर्यादा ठेवली नाही. कारण सोपे आहे—या प्लॅटफॉर्मवरून महागड्या किमतीत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटावर फिफाला तब्बल १५ टक्के कमिशन मिळणार आहे.
अनेक फुटबॉल चाहत्यांसाठी फिफा विश्वचषकाचा प्रवास करणे हे एक स्वप्न असते. जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवाचा थरार जवळून अनुभवण्यासाठी अनेक जण वर्षानुवर्षे पैशांची बचत करतात. परंतु स्कॉटलंडच्या अनेक फुटबॉल चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांचे पैसेही अडकले आहेत; कारण स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांचे व्हिसा अप्रूव्हल अचानक बदलण्यात आले किंवा रद्द केले गेले. 'बीबीसी'शी बोलताना काही चाहत्यांनी सांगितले की, व्हिसा मंजूर झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी विमानाची तिकिटे, हॉटेल्स आणि देशांतर्गत प्रवासासाठी बुकिंग केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचे ट्रॅव्हल परमिट नाकारण्यात आले. आता स्पर्धा अगदी तोंडावर असल्याने हे बुकिंग रद्द किंवा रीशेड्युल करता येत नाहीये, ज्यामुळे या चाहत्यांचे लाखो रुपये वाया जाणार आहेत.