स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी ब्राझीलला मोठा धक्‍का; स्टार खेळाडू नेमारच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

FIFA World Cup 2026 : प्रशिक्षक अँसेलोटी यांनी दिली दुखापतीबाबत अपडेट

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 Neymar Injury Update : फुटबॉलचा महाकुंभ म्हणजेच फिफा विश्वचषक २०२६ चा बिगुल वाजला असून साखळी सामन्यांचा थरार सुरू झाला आहे. सध्या जगभरातील क्रीडाप्रेमींचे डोळे दिग्गज संघांतील स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर खिळले आहेत. या सगळ्यात सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती ब्राझीलचा जादूगार नेमारची! ब्राझीलला पुन्हा एकदा विश्वविजेता बनवण्यासाठी नेमार हा या संघाचा सर्वात महत्त्वाचा कणा मानला जात आहे; पण ब्राझीलच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. मोरोक्कोविरुद्ध होणाऱ्या पहिल्याच सामन्यात ब्राझीलला आपल्या या स्टार खेळाडूशिवाय म्हणजेच नेमारशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.

नेमारच्या दुखापतीमध्ये सुधारणा: प्रशिक्षक अँसेलोटी

शनिवारी न्यू जर्सी येथे मोरोक्कोविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना प्रशिक्षक अँसेलोटी म्हणाले की, नेमार सध्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीमधून सावरत आहे. दुखापतीमध्ये सुधारणा होत आहे, पण तो अजून मैदानावर परतण्यासाठी पूर्णपणे तयार नाही. वो लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी जिम आणि मैदानावर प्रचंड मेहनत घेत आहे. पुढच्या आठवड्यापासून तो संघासोबत पूर्ण सरावात उतरेल अशी आशा आहे.

संपूर्ण गट-फेरीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नेमारला कदाचित संपूर्ण गट-फेरीला मुकावे लागू शकते. आम्हाला आशा आहे की तो पुढच्या आठवड्यात पूर्ण सरावात सहभागी होऊ शकेल," असेही अँसेलोटी म्हणाले. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चाहत्यांना नेमारची जादू पाहायला मिळणार नसून, त्याच्या अनुपस्थितीत ब्राझील हे आव्हान कसे पेलणार याकडे आता संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.

नेमार होता सरावावेळी अनुपस्थित

फिफा विश्वचषकात 'ग्रुप एफ' (Group F) मध्ये ब्राझीलचा पुढील सामना १९ जून रोजी हैतीविरुद्ध आणि २४ जून रोजी स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये स्टार खेळाडू नेमार खेळणार की नाही, याची हमी मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी दिलेली नाही. ३४ वर्षीय नेमार (सँटोसचा माजी स्ट्रायकर) शुक्रवारी झालेल्या सराव सत्रातही गैरहजर होता. प्रशिक्षक अँसेलोटी यांनी संघात स्थान दिल्यापासून तो एकही सामना खेळलेला नाही. या दुखापतीमुळेच नेमारला विश्वचषकापूर्वी झालेल्या पनामा आणि इजिप्तविरुद्धच्या सराव सामन्यांनाही मुकावे लागले होते.

तंदुरुस्त नसतानाही विश्वचषक संघात का स्थान दिले?

नेमारून पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला विश्वचषक संघात का स्थान देण्यात आले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रशिक्षक अँसेलोटी म्हणाले की, "नेमारचा अनुभव आणि त्याची मैदानातील उपस्थिती आमच्या संघातील तरुण खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची आहे. तो युवा खेळाडूंसाठी एक उत्तम आदर्श ठरू शकतो, म्हणूनच त्याचा संघात समावेश केला आहे." अँसेलोटी यांच्या स्पष्टीकरणानंतर नेमार थेट मैदानावर कधी उतरणार, याकडे त्याच्या चाहत्यांसह फुटबॉल जगताचे लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT