India vs West Indies T20 World Cup 2026
भारतीय क्रिकेट रसिक कमालीचे हळवे आहेत. आपण खेळाकडे केवळ खेळ म्हणून न पाहता त्याकडे भावनांच्या नजरेतून पाहतो. म्हणूनच, जेव्हा टीम इंडियाचा पराभव होतो, तेव्हा अनेकदा मैदानावर किंवा परिस्थितीवर 'अनलकी' असा शिक्का मारला जातो. भारतीय संघ आणि कोलकाताचे ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदान यांच्यातही असेच काहीसे नाते आहे. तांत्रिकदृष्ट्या ही अंधश्रद्धा वाटत असली, तरी इतिहासातील काही पराभव विसरता येण्यासारखे नाहीत. विशेषतः विश्वचषकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर या मैदानावर भारताला पत्करावा लागलेला पराभव हे एक दाहक वास्तव आहे. आता टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीतील (Semi-finals) स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघ रविवार, १ मार्च रोजी वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया ईडन गार्डन्स मैदानावरील महत्त्वपूर्ण सामनांविषयी. तसेच दहा वर्षांपूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं होते याविषयी....
वर्ष होते १९९६. भारत एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यापासून केवळ दोन पावले दूर होते. सेमी फायनलचा सामना श्रीलंकेविरुद्ध होता. आता समोर श्रीलंका आहे म्हणजे विजय निश्चित, अशा भ्रमात क्रिकेट चाहते होते. मात्र दुसऱ्या डावात खेळपट्टीने फिरकीला साथ दिली. भारताचा डाव कोसळला. प्रेक्षकांनी गोंधळ घातला. अखेर श्रीलंकेला विजय घोषित करण्यात आला.
१९९९ मध्ये याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला देण्यात आलेला 'रन-आउट'चा निर्णय वादग्रस्त ठरला. यानंतर सामन्याचे चित्र पालटले. भारताचा पराभव झाला. यानंतर ईडन गार्डन्सवर अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे नोव्हेंबर २०२५ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर झालेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात छोटे लक्ष्य गाठण्यात भारत अपयशी ठरला. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये ईडन गार्डन्स मैदान हे अनलकी मानण्यास बळ मिळाले.
मानवी स्वभाव हा सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक गोष्टीच अधिक लक्षात ठेवतो. मात्र ईडन गार्डन्स या मैदानावर भारताने काही नामुष्कीजनक पराभव पत्करले असले तरी काही ऐतिहासिक विजयांची नोंद केली आहे. याच मैदानावर २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने २८१ धावा करत सामन्यात पुनरागमन केले होते. याच मैदानावर हरभजन सिंगने घेतलेली हॅट्ट्रिक आजही क्रिकेट रसिकांच्या मनात आहे. २०१४ मध्ये रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २६४ धावांचा विक्रम याच मैदानावर केला होता.
२०१६ चा टी-२० विश्वचषक हा भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक होता. या स्पर्धेत यजमान असणारा भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. ३१ मार्च २०१६ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या ४७ चेंडूत नाबाद ८९ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर २० षटकांत २ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला होता. १९३ धावांचे लक्ष्य टी-२० मध्ये वानखेडेवर कठीण मानले जात होते. मात्र लेंडल सिमन्सने सामन्याचे चित्र पालटले. या सामन्यात सिमन्सला तब्बल ३ वेळा जीवनदान मिळाले. सिमन्सने नाबाद ८२ धावा केल्या. आंद्रे रसेलने फक्त २० चेंडूत ४३ धावांची खेळी निर्णायक ठरली. वेस्ट इंडिजने १९.४ षटकांत लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला.
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता दमदार कामगिरी केली आहे. मात्र आता भारतीय संघ रविवारी, १ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध व्हर्च्युअल उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. आता ईडन गार्डन्स मैदानावर भारत विजय मिळवत अनलकीचा टॅग पुसणार का, याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.