Hardik Pandya Unfollow MI Pudhari
स्पोर्ट्स

Hardik Pandya: हार्दिक पंड्याने MI ला इंस्टाग्रामवर केलं Unfollow? IPL मधून बाहेर पडल्यानंतर चर्चांना उधाण

Hardik Pandya Unfollow MI: IPL 2026 मधून मुंबई इंडियन्स बाहेर पडल्यानंतर हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर MI ला ‘अनफॉलो’ केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Hardik Pandya Unfollow MI: IPL 2026 मधून मुंबई इंडियन्स (MI) बाहेर पडल्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याचं इंस्टाग्राम. सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली की, हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सला इंस्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केलं आहे. त्यामुळे हार्दिक आणि MI यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे.

ही चर्चा RCB विरुद्धच्या सामन्यानंतर सुरू झाली. 10 मे रोजी रायपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आणि संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. यानंतर काही चाहत्यांनी हार्दिकच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लक्ष दिलं आणि त्याच्या ‘Following’ यादीत मुंबई इंडियन्सचं अकाउंट दिसत नसल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला.

काही वेळासाठी हार्दिकच्या प्रोफाइलवर तो 150 अकाउंट्स फॉलो करत असल्याचं दिसत होतं आणि त्यामध्ये मुंबई इंडियन्सचं नाव नव्हतं. यामुळे सोशल मीडियावर लगेच चर्चांना उधाण आलं.

Hardik Pandya Unfollow MI

मात्र, काही मिनिटांनंतर परिस्थिती बदलली. हार्दिकच्या प्रोफाइलवर ‘Following’ संख्या पुन्हा 151 झाली आणि मुंबई इंडियन्सचं अकाउंट पुन्हा दिसू लागलं. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हे चुकून झालं होतं का? इंस्टाग्राममधील काही तांत्रिक बिघाड होता का? की पराभवानंतरच्या निराशेतून हार्दिकने खरंच असा निर्णय घेतला होता?

या संपूर्ण प्रकरणावर हार्दिक पंड्या किंवा मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी हे प्रकरण केवळ सोशल मीडियावरील चर्चांपुरतंच मर्यादित आहे.

Hardik Pandya Unfollow MI

पण या घटनेने इतकं लक्ष वेधून घेण्यामागे एक मोठं कारण आहे. हार्दिक पंड्या IPL 2024 आधी गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि त्याला थेट कर्णधारपद देण्यात आलं. त्यानंतर चाहत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. काहींनी त्याचं स्वागत केलं, तर अनेकांनी रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

तेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खराब कामगिरीनंतर हार्दिकवर टीका होताना दिसली. त्यामुळे आता इंस्टाग्रामवरील या छोट्या हालचालीमुळेही मोठी चर्चा होत आहे.

हार्दिक आणि MI मध्ये खरंच दुरावा वाढतोय?

यामागे IPL 2026 मधील मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी हेही एक कारण मानलं जात आहे. यंदा संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही आणि RCB विरुद्धच्या पराभवानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवास संपला.

हार्दिक पंड्यासाठीही हा हंगाम फारसा चांगला ठरला नाही. यंदा त्याने आठ सामन्यांत फक्त 146 धावा केल्या आणि केवळ चार विकेट्स घेतल्या. त्यातच दुखापतींमुळे त्याला काही सामनेही गमवावे लागले.

पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकला तीन सामने खेळता आले नाहीत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना त्याने गमावला आणि त्यानंतर RCB विरुद्धच्या सामन्यासाठीही त्याला वैद्यकीय परवानगी मिळाली नव्हती. हार्दिकच्या अनुपस्थितीत, सूर्यकुमार यादवने संघाचं नेतृत्व केलं.

दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्स व्यवस्थापन अजूनही हार्दिकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे. संघाची खराब कामगिरी ही फक्त कर्णधारपदाची समस्या नसून बदलत्या T20 क्रिकेटशी जुळवून घेण्याचं आव्हान असल्याचं व्यवस्थापनाचं मत आहे.

तरीही, प्लेऑफमधून लवकर बाहेर पडणं आणि त्यात इंस्टाग्रामवरील या घटनेमुळे हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समधील भवितव्याबाबतच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. आता पुढे हार्दिक आणि MI यांचं नातं कोणत्या दिशेने जातं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT