dhruv jurel at number 6 karun nair gets another chance says akash chopra
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. पण त्या आधी भारतीय संघातील दुखापतींच्या सत्रामुळे चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी आपल्या संभाव्य अंतिम 11 खेळाडूंची निवड केली असून, त्यात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला सहाव्या क्रमांकावर स्थान दिले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या समाप्तीनंतर आणि चौथ्या कसोटीच्या प्रारंभापूर्वी भारतीय संघात जणू समस्यांचे वादळच आले आहे. दुखापतींच्या रूपाने हे संकट समोर आले असून, त्यामुळे अनेक प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर बसावे लागले आहे.
अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी हे दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत, तर ऋषभ पंत आणि आकाश दीप हेदेखील पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. या दुखापतींनी भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मोहिमेला मोठा धक्का दिला आहे. या सर्व समस्यांमध्ये भारताचा अंतिम संघ कसा असावा, याबाबत आकाश चोप्रा यांनी आपल्या 'यूट्यूब' चॅनलवर सविस्तर विश्लेषण केले आहे.
आकाश चोप्राच्या मते, सलामीची जबाबदारी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावरच सोपवावी, कारण दोघेही सध्या चांगल्या लयीत आहेत. ‘यशस्वी मागील सामन्यात अपयशी ठरला, पण प्रत्येक सामन्यात त्याने धावा कराव्यात हे आवश्यक नाही. त्याच्यात क्षमता आहे आणि तो निश्चितपणे पुनरागमन करेल,’ असे चोप्राने सांगितले.
तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांनी करुण नायरला पसंती दिली आहे. चोप्रा याच्या मते, ‘ही करुणसाठी अखेरची संधी ठरू शकते. या सामन्यात तो अपयशी ठरल्यास, त्याचे संघातील पुनरागमन कठीण होऊ शकते. त्याची कामगिरी जरी उत्कृष्ट नसली, तरी तो खेळू शकत नाही असेही दिसले नाही. त्यामुळे माझ्या संघात तिसऱ्या क्रमांकावर तोच असेल.’
संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडेच राहील आणि तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ऋषभ पंतच्या तंदुरुस्तीबाबत चोप्रा म्हणाला, ‘जर पंत दुखापतीमुळे यष्टीरक्षण करू शकत नसेल, तर त्याला एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून संघात स्थान द्यावे. अशा परिस्थितीत, सहाव्या क्रमांकासाठी ध्रुव जुरेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या त्याच्याशिवाय या जागेसाठी दुसरा योग्य खेळाडू दिसत नाही. जर पंत यष्टीरक्षण करत असेल, तर नितीश रेड्डीच्या जागी ध्रुव जुरेलला एक क्षेत्ररक्षक म्हणूनही खेळवता येईल.’
अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करावा, तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे सोपवावी. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून अंशुल कंबोजला संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘प्रसिद्ध कृष्णाला दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली, मात्र तो खूप महागडा ठरला होता. त्यामुळे अंशुल कंबोज या सामन्यातून पदार्पण करू शकतो,’ असेही चोप्राने नमूद केले.
के.एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज,