India VS New Zealand 2ND TEST Day 3 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ३ गडी गमावून १३३ धावा केल्या. रचिन रवींद्र ४६ धावांवर आणि डॅरिल मिचेल ५ धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी आज भारताचा पहिला डाव २४६ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ ११० धावांच्या आघाडीसह मैदानात उतरला होता. त्यामुळे न्यूझीलंडची एकूण आघाडी २४३ धावांची झाली आहे. मिचेल आणि रचिन यांच्यात चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारीही रचली गेली आहे. आणखी दोन पूर्ण दिवसांचा खेळ बाकी असताना न्यूझीलंड मजबूत स्थितीत आहे.
क्राइस्टचर्च येथील हॅग्ली ओव्हल मैदानावरील दुसर्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावा उभारल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताचा पहिला डाव ८६.१ षटकांत २४६ धावांत संपुष्टात आला. तिसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ११६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पुढच्या १३० धावांत उर्वरित चारही गडी गमावले. आजचा पहिला धक्का अंशुल कंबोजच्या रूपाने बसला. खाते न उघडताच तो मॅट हेन्रीचा बळी ठरला. त्यानंतर ध्रुव जुरेलने तळाच्या फलंदाजांसोबत भक्कम भागीदारी साकारली.
क्राइस्टचर्च येथील हॅग्ली ओव्हल मैदानावर आज ६ बाद ११६ धावांवरून पुढे खेळत भारताने पहिल्या डावात २४६ धावांपर्यंत मजल मारली. शनिवारच्या २४० धावांच्या मोठ्या फरकावरून ही तफावत ११० धावांवर आणून ठेवली. आजचा दिवस खर्या अर्थाने गाजवला तो ध्रुव जुरेल याने. त्याचे शतक थोडक्यात हुकले; पण त्याच्या ८८ धावांच्या खेळीने भारतीय संघाला मोठा आधार दिला. त्याला खालच्या फळीतील फलंदाजांचीही चांगली साथ लाभली.
जुरेलने सुरुवातीला आकाश दीपसोबत आठव्या विकेटसाठी ७४ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला १५७ धावांची गरज होती. आकाश दीपने ५२ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. त्याला नॅथन स्मिथने यष्टिरक्षक ब्लंडेलकरवी झेलबाद केले. त्यानंतर जुरेलने गुरनूर ब्रारसोबत १२३ चेंडूंत ६४ धावा जोडल्या. गुरनूरने ४६ चेंडूंत १० धावा केल्या. काइल जेमिसनने त्याला त्रिफळाचित केले. या दोन भागीदाऱ्यांच्या जोरावर भारताने २०० धावांचा टप्पा पार केला. यानंतर जुरेलने बुमराहसोबत दहाव्या विकेटसाठी १९ धावांची भर घातली. अखेरीस काइल जेमिसनने जुरेलला ब्लंडेलकरवी झेलबाद करत भारताचा डाव २४६ धावांवर गुंडाळला. जुरेलने १७० चेंडूंचा सामना करत १४ चौकारांसह ८८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून जेमिसनने चार गडी बाद केले. तर मॅट हेनरी, नॅथन स्मिथ आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडला दुसऱ्या डावात तीन धक्के बसले. यामध्ये कर्णधार टॉम लॅथम (८), हेन्री निकोल्स (२२) आणि डेव्हॉन कॉनवे (५१) यांच्या समावेश आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन बळी घेत बळींचा दीर्घ काळ चाललेला दुष्काळ संपवला, तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट मिळवली. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरी कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळासाठी उद्या (सोमवार, 30 नोव्हेंबर) भारतीय वेळेनुसार पहाटे ३:३० वाजता सुरु होईल.