स्पोर्ट्स

INDW Vs ENGW : दीप्तीच्या करामतीने इंग्लिश चाहते चिडले

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : भारत-इंग्लंड महिला (INDW Vs ENGW) संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. पूर्वी खेळभावनेविरोधी म्हटल्या जाणार्‍या आणि आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेल्या 'मंकडिंग'च्या मदतीने भारताच्या दीप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूला बाद करून भारताला सामना जिंकून दिला. दीप्ती शर्माने मिळवलेल्या या विकेटची सध्या जगभरात चर्चा होत आहे. भारताने हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमी बर्मी आर्मी नाराज आहेत.

बर्मी आर्मी हा इंग्लंड संघाच्या प्रेक्षकांचा गट आहे. मैदानावर उपस्थित राहून आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याचे काम ते करतात. यातून ते अनेकवेळा गैरवर्तनही करतात. विरोधी संघाच्या प्रेक्षकाला शिवीगाळ, मारहाण याचबरोबर विरोधी खेळाडूला अपशब्द बोलणे यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत. या बर्मी आर्मीने भारताने सामना जिंकल्यानंतर एक ट्विट केले. दीप्तीने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले ते नियमांना धरूनच आहे, पण तिने जे केले ते खरे क्रिकेट नाही. खेळ संपवण्याची ही एक चुकीची पद्धत आहे, असे बर्मी आर्मीने ट्विट केले.

त्यानंतर भारतीयांनी बर्मी आर्मी ग्रुपला जशास तसे उत्तर दिले. अवी शेठ या भारतीयाने त्यांना उत्तर देताना म्हटले आहे की, 'जा आणि नियमाचे पुस्तक वाचून या. कदाचित इंग्रजी ही तुमची भाषा नसेल तर पुस्तक वाचण्यासाठी कशाची तरी मदत घ्या.' आकाश नावाच्या क्रिकेटप्रेमीने ट्विट केले आहे की, 'बर्मी आर्मीच्या डोळ्यातील पाणी पाहून माझा शनिवार सार्थकी लागला.'

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दीप्तीला पाठिंबा दिला आहे. दीप्तीने क्रिकेटमधील नियमानुसारच बळी घेतला, अशी प्रतिक्रिया कौरने सामन्यानंतर दिली आहे. याशिवाय भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी दीप्तीच्या कृतीचे समर्थन केले असून हे सगळे नियमानुसार झाल्याचे म्हटले आहे.

सामन्यामध्ये नेमके काय घडले होते? (INDW Vs ENGW)

इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिने 80 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या होत्या. मात्र, 43 व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर भारतीय गोलंदाज दीप्ती शर्माने क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. दीप्ती शर्माने चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रिझ सोडले. हीच संधी साधत दीप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले. याआधी फलंदाजाला अशा प्रकारे बाद करण्याला 'मंकडिंग' म्हटले जायचे. विशेष म्हणजे 'मंकडिंग' हे खेळभावनेविरोधी असल्याचे म्हटले जायचे. मात्र, आता गोलंदाजाने फलंदाजाला अशा प्रकारे बाद केले, तर त्याला अधिकृतपणे धावबाद म्हणून बाद दिले जाते. याच बदललेल्या नियमांचा आधार घेत दीप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले आणि सामन्यात विजय मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT