David Warner Drink And Drive Pudhari
स्पोर्ट्स

David Warner: डेव्हिड वॉर्नर अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात दोषी; 9 महिने तुरुंगात जावे लागणार, क्रिकेट करिअर धोक्यात

David Warner Drink And Drive: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी न्यायालयात दोषी असल्याची कबुली दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

David Warner Drink And Drive: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर खेळाडू डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वॉर्नरने न्यायालयात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याची (Drink Driving) कबुली दिली असून, त्याला नऊ महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दंड आणि ड्रायव्हिंगवर बंदी अशी शिक्षा मिळू शकते. या प्रकरणामुळे त्याचे सिडनी थंडर संघाचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.

न्यायालयात दोषी असल्याची कबुली

सिडनीतील स्थानिक न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वॉर्नरचे वकील बॉबी हिल यांनी त्याच्या वतीने दोषी असल्याची कबुली दिली. वॉर्नर स्वतः न्यायालयात उपस्थित नव्हता. हे प्रकरण 5 एप्रिल रोजी घडले होते.

सिडनीतील मारुब्रा परिसरात पोलिस वाहनांची मद्यचाचणी करत असताना वॉर्नरने तपासणी पूर्वीच आपली कार थांबवली. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात नेले.

तपासात काय आढळले?

पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या चाचणीत वॉर्नरच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) 0.104 इतके आढळले. ऑस्ट्रेलियात कायदेशीर मर्यादा 0.05 आहे. पण वॉर्नरच्या रक्तातील हे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त होते.

वॉर्नरच्या वकिलांनी न्यायालयाबाहेर सांगितले की, मित्राच्या घरी तीन ग्लास वाईन घेतल्यानंतर वॉर्नरने मोठी चूक केली. शेवटचा पेग घेतल्यानंतर त्याने कार चालवण्याचा निर्णय घेतला. राईड-शेअर सेवा वापरण्याऐवजी स्वतः वाहन चालवण्याचा निर्णय हा "बेजबाबदार आणि चुकीचा" असल्याचे त्यांनी मान्य केले.

कोणती शिक्षा होऊ शकते?

न्यू साऊथ वेल्सच्या कायद्यानुसार, पहिल्यांदाच मद्यधुंद वाहन चालवण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यास:

  • कमाल 9 महिन्यांपर्यंत तुरुंगवास

  • 2,200 ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंत दंड

  • 6 ते 12 महिन्यांसाठी वाहन चालवण्यास बंदी

अशी शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाचा अंतिम निकाल 18 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

सिडनी थंडरचे कर्णधारपद धोक्यात

या गुन्ह्याचा परिणाम वॉर्नरच्या क्रिकेट कारकिर्दीवरही होण्याची शक्यता आहे. सिडनी थंडर संघाचा कर्णधार म्हणून त्याचे पद आता धोक्यात आले असून, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर क्रिकेट न्यू साऊथ वेल्स आणि सिडनी थंडर व्यवस्थापन त्याच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेणार आहे.

क्रिकेट न्यू साऊथ वेल्सची प्रतिक्रिया

क्रिकेट न्यू साऊथ वेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ली जर्मन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संस्था सुरक्षित वाहनचालवण्याच्या बाजूने आहे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही.

आधीही वादात अडकला होता वॉर्नर

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती. मात्र, 2024 मध्ये या बंदीचा पुनर्विचार करून त्याला पुन्हा संघाचे नेतृत्व करण्यास पात्र ठरवण्यात आले.

आता या नव्या प्रकरणामुळे त्याच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी बिग बॅश लीग (BBL) हंगामापूर्वी त्याचे कर्णधारपद कायम राहणार की नाही, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT