Zaheer Khan CSK head coach IPL 2027 Pudhari
स्पोर्ट्स

CSK New Head Coach : 'चेन्नई सुपर किंग्स'ची मोठी घोषणा; माजी वेगवान गोलंदाज झहीर खान नवीन हेड कोच!

स्टीफन फ्लेमिंग यांचा CSK सोबत १८ वर्षांच्‍या सोबतीला मिळाला पूर्णविराम

पुढारी वृत्तसेवा

Zaheer Khan CSK head coach IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. झहीरने स्टीफन फ्लेमिंगची जागा घेतली आहे. स्टीफन फ्लेमिंगहा तब्‍बल १८ वर्ष चेन्नई सुपर किंग्सबरोबर होता.

झहीर खान होता लखनौ सुपर जायंट्सचा मेन्‍टर

चेन्नईमध्ये येण्यापूर्वी, झहीर २०२५ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक (मेन्टर) होता, परंतु एका वर्षानंतर त्याने ते पद सोडले होते.

सलग तिसर्‍या हंगामात सीएसकेची कामगिरी निराशाजनक

सलग तिसऱ्या हंगामात सीएसकेला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आल्यानंतर, फ्रँचायझीने २००९ पासून मुख्य प्रशिक्षक असलेल्या फ्लेमिंगचा पर्याय शोधण्‍यास सूरुवात केली होती. फ्लेमिंगला हटवल्यानंतर सीएसकेचे सीईओ आणि एमडी काशी विश्वनाथन यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले की, फ्रँचायझीने नवीन प्रशिक्षक शोधण्याची जबाबदारी धोनीवर सोपवली होती. फ्लेमिंग यांचा उत्तराधिकारी देखील परदेशातूनच येईल, असे सुरुवातीला संकेत मिळाले होते, मात्र अखेर झहीर खानकडे ही जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.

झहीरकडे विविध फॉरमॅट्सचा मोठा अनुभव

"चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची 'टाटा आयपीएल २०२७' साठी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. २०११ च्या यशस्वी विश्वचषक मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या झहीरकडे विविध फॉरमॅट्सचा मोठा अनुभव आहे; त्याने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये झहीरने १०० सामने खेळले आहेत आणि निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षणाची भूमिका स्वीकारली आहे," असे चेन्नई सुपर किंग्सने निवेदनात म्हटले आहे.

स्टीफन फ्लेमिंग यांचे 'सुपर किंग्स' सोबतचे १८ वर्षांचे नाते संपले

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे तब्बल १८ वर्षांचे जुने नाते आता संपले आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात (२००८) फ्लेमिंग एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळाडू म्हणून या संघात सामील झाले होते. संघ उपविजेतेपद पटकावल्यानंतर, २००९ च्या हंगामापूर्वीच न्यूझीलंडच्या या माजी कर्णधाराकडे मुख्य प्रशिक्षकची धुरा सोपवण्यात आली. इथून सुरू झालेला हा प्रवास आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दींपैकी एक ठरला. स्टीफन फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने ५ वेळा आयपीएल जेतेपद आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीग पटकावला होता.

आज निरोप घेताना माझ्या मनात केवळ कृतज्ञतेची भावना : स्टीफन फ्लेमिंग

आपल्या या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना फ्लेमिंग भावनिक झाले. ते म्हणाले, "खेळाच्या जगात अठरा वर्षे हा खूप मोठा काळ आहे. आज निरोप घेताना माझ्या मनात केवळ कृतज्ञतेची भावना आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबत काम करणे हा माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील सर्वोच्च सन्मान होता. आम्ही मिळवलेल्या प्रत्येक यशाचा मला सार्थ अभिमान वाटतो."

आयपीएलमधील यशस्‍वी संघाचा भाग होणे सन्‍मानाची गोष्‍ट : झहीर खान

"आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एकाचा भाग होणे ही सन्मानाची गोष्ट आहे. एक क्रिकेटपटू म्हणून मी मैदानात सीएसकेचा (CSK) सामना केला आहे आणि त्या लढतींचा मनसोक्त आनंद घेतला आहे. चेपॉकवरील 'सुपरफॅन्स'मुळे निर्माण होणारे वातावरण याला अधिक खास बनवते. इतका समृद्ध इतिहास असलेल्या या प्रतिष्ठित फ्रँचायझीमध्ये सामील होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे," असे झहीर म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT