Cristiano Ronaldo first billionaire footballer :
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे. तो ४० वर्षाचा झाल्यामुळं त्याच्या निवृत्तीची चर्चा नेहमी रंगत असते. आगामी फुटबॉल वर्ल्डकप हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप असेल असं देखील जाणकार बोलत आहेत. मात्र याच दरम्यान, रोनाल्डोने एक मोठा धमाका केला. तो जगातील पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू झाला आहे. त्यानं नुकतेच सौदी अरेबिया प्रो लीगसाठी अल नास्सरसोबत नवीन करार केला. यामुळं त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची कायम तुलना केली जाते. फुटबॉलच्या मैदानावर ही तुलना करणं अन् कोण ग्रेट हे सांगणं अवघड असलं तरी रोनाल्डोनं एका बाबतीत मात्र मेस्सीला खूप मागं टाकलं आहे. मेस्सी आणि रोनाल्डो हे अनेक वर्षं कमाईच्या बाबतीत एकमेकांना काटें की टक्कर देत होते.
मात्र रोनाल्डोनं २०२३ मध्ये सौदी अरेबिया प्रो लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला अन् त्याच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ होऊ लागली. दुसरीकडं मेस्सीनं अमेरिकेच्या मेजर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. सौदी प्रीमियर लीगमधील क्लब एल अल नास्सर रोनाल्डोसाठी सर्वात जास्त वार्षिक फी पे करतो. विशेष म्हणजे सौदी अरेबियातील कमाई ही टॅक्स फ्री देखील असते. त्यामुळे रोनाल्डोला युरोपीयन क्लबकडून मिळणाऱ्या पैशापेक्षा अल नास्सरकडून मिळणारी निव्वळ रक्कम ही खूप मोठी आहे.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार रोनाल्डोची कमाई ही १.४ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. रोनाल्डोने २००२ ते २०२३ पर्यंत ५५० मिलिनय युएस डॉलर एवढी कमाई सॅलरीमधून केली होती.
ब्रँड प्रमोशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर दशकभरापूर्वीच्या एका रिपोर्टनुसार Nike सोबत रोनाल्डोनं वार्षिक १८ मिलिनय डॉलरची डील साईन केली होती. तर Armani and Castrol सारख्या ब्रँडच्या जाहिरातीतून त्याला १७५ मिलियन डॉलर मिळाले होते.
२०२३ पासून रोनाल्डो अल नास्सर कडून खेळतोय. त्याला या क्लबकडून वर्षाला २०० मिलियन युएस डॉलर सॅलरी मिळते. विशेष म्हणजे ही सॅलरी टॅक्स फ्री आहे तसंच त्याला बोनस देखील मिळतोय. त्याला वर्षाला ३० मिलियन डॉलर सायनिंग बोनस मिळतो. या डीलमुळं रोनाल्डो आता बिलेनियर झाला आहे. त्यानं जून २०२५ मध्ये अल नास्सरसोबतचा आपला करार वाढवला आहे.
नवीन करारानुसार त्याला ४०० मिलिनय डॉलर रूपये मिळणार आहेत. त्याचबरोबर त्याला अल नास्सर क्लबमध्ये १५ टक्के हिस्सेदारी देखील मिळणार आहे.