स्पोर्ट्स

Cricket Record : 22 चौकार-षटकार..! ‘CSK’च्या 17 वर्षीय फलंदाजाने 31 चेंडूत ठोकले धडाकेबाज शतक

T20 Trophy : 37 चेंडूंमध्ये नाबाद 119 धावांची अविस्मरणीय खेळी

रणजित गायकवाड

cricket record csk 17 year old batsman hit century in 31 balls t20 trophy

हैदराबाद : सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 स्पर्धेची सुरुवात अत्यंत धमाकेदार झाली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK)चा युवा फलंदाज उर्विल पटेलने विक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने केवळ 31 चेंडूंमध्ये तडाखेबंद शतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे.

37 चेंडूत नाबाद 119 धावा

एलिट ग्रुप सी मधील पहिला सामना हैदराबादच्या जिमखाना ग्राउंडवर गुजरात आणि सर्विसेस या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात गुजरातचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 वर्षीय उर्विल पटेलने आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर सर्वांना अचंबित केले.

उर्विल पटेलने केवळ 37 चेंडूंमध्ये नाबाद 119 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली. यादरम्यान त्याने फक्त 31 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. उर्विलच्या या तुफानी शतकी खेळीमुळे गुजरातने 183 धावांचे मोठे लक्ष्य केवळ 12.3 षटकांत सहज गाठले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.

चौकार-षटकारांचा वर्षाव: स्ट्राइक रेट 321.62

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सर्विसेस संघाने गुजरातसमोर 183 धावांचे आव्हान ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना उर्विल पटेलने गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने 321.62 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. या स्फोटक खेळीत त्याने 12 खणखणीत चौकार आणि 10 उत्तुंग षटकार ठोकले.

IPL मध्ये CSK चा महत्त्वपूर्ण भाग

उर्विल पटेल हा इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सीएसकेने त्याला आगामी हंगामासाठी देखील संघात रिटेन केले आहे. मागील IPL हंगामात त्याला सीएसकेकडून 3 सामने खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यात त्याने 22.66 च्या सरासरीने 68 धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे, त्यावेळेसही त्याचा स्ट्राइक रेट 212 पेक्षा अधिक राहिला होता. ज्यामुळे त्याची जलद धावा करण्याची क्षमता सिद्ध होते. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमधील हा फॉर्म तो आगामी IPL हंगामातही कायम ठेवण्यास उत्सुक असेल.

सर्विसेसकडून गौरव कोचरची झुंज

दुसरीकडे, सर्विसेस संघाकडून फलंदाजी करताना गौरव कोचर याने एकाकी झुंज दिली. 37 चेंडूं मध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्याशिवाय अरुण कुमारने 29 आणि जयंत गोयतने 20 धावांचे योगदान दिले. गुजरातकडून गोलंदाजी करताना अर्जन नागवासवाला आणि हेमंग पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT