Cricket India Women vs Sri Lanka Women Tri-Nation Series 2025 Final
कोलंबो : भारत आणि श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघांमधील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना कोलंबो येथे खेळवण्यात आला. भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला आणि विजेतेपदावर नाव कोरले. भारताने यजमान श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव केला. या सामन्यात स्मृती मानधनाने शतक झळकावले, तर हरलीन देओल, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी प्रत्येकी 40 पेक्षा जास्त धावांच्या खेळी साकारल्या. तर गोलंदाजीत स्नेहा राणाने 4 विकेट्स घेतल्या. अमनजोत कौरनेही 3 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यासह पाच सामने खेळले, त्यापैकी चार सामने संघाने जिंकले. संघाला एका सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला.
स्मृती मानधनाच्या शतकासह स्नेहा राणा आणि अमनजोत कौर यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला तिरंगी मालिका 2025 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाचा 97 धावांनी पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने या सामन्यात टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेसमोर विजयासाठी 343 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संघ 48.2 षटकांत 245 धावांवरच आटोपला.
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधनाने शानदार खेळी केली. तिने 92 चेंडूत शतक पूर्ण केले. तर एकूण सामन्यात तिने 101 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा फटकावल्या. मानधनाचे हे तिच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 11 वे शतक आहे. या सामन्यात, तिने प्रतिका रावलसोबत पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली, तर दुसऱ्या विकेटसाठी तिने हरलीन देओलसोबत 120 धावांचे योगदान दिले.
अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाची फलंदाजी जबरदस्त होती. संघाने 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावा केल्या. मानधनाच्या शतकाव्यतिरिक्त, हरलीन देओलने 47 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 41 धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्जने 29 चेंडूत 4 चौकारांसह 44 धावा केल्या. तिन्ही फलंदाजांना अर्धशतकाने हुलकावणी दिली. याशिवाय, खालच्या फळीतील फलंदाज अमनजीत कौरने 12 चेंडूत 18 धावा केल्या तर दीप्ती शर्माने 14 चेंडूत 20 धावांची नाबाद खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात अमनजोत कौरने हसिनी परेराला बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर विश्मी गुणरत्ने आणि चामारी अटापट्टू यांनी संघाचा डाव सावरला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी केली. मात्र, यानंतर अमनजोतने आपल्या गोलंदाजीने कहर केला. दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. विश्मी 36, तर चामारी 51 धावा काढून बाद झाली. याशिवाय निलाक्षीका सिल्वाने 48, हर्षिता समरविक्रमाने 26 आणि देवमी विहंगाने चार धावा केल्या. नंतर, अनुष्का संजीवनी आणि सुगंधिका कुमारी यांनी काही चांगले फटके मारले पण त्यांना त्यांच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. दोघीही अनुक्रमे 28 आणि 27 धावा करून बाद झाल्या.