कोलंबो, वृत्तसंस्था : Sri lanka Cricket : श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असून त्यापूर्वी फलंदाजी सल्लागार पदावरुन जयवर्धनेनेही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. सिल्वरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली लंकेने 2022 मधील आशिया चषक स्पर्धा जिंकली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील वन डे मालिका जिंकली, तसेच बांगलादेशविरुद्ध विदेशी भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. याशिवाय, ते 2023 आशिया चषक फायनलमध्येही पोहोचले होते. अलीकडेच, 2022 व 2024 आयसीसी टी20 विश्वचषक व 2023 वन डे विश्वचषकात मात्र त्यांना बाद फेरीही गाठता आली नाही. यंदाच्या टी20 विश्वचषकात तर ते सुपर-8 फेरीतही पोहोचू शकले नाहीत.
टी20 विश्वचषकात श्रीलंकेचा संघ सुपर-8 फेरीतही पोहोचू शकला नाही.
श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला
फलंदाजी सल्लागार पदावरुन जयवर्धनेने पायउतार होणार आहे.
सिल्वरवूड यांनी वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे यावेळी जाहीर केले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकपद सांभाळत असताना बराच वेळ द्यावा लागतो. कुटुंबापासून बरेच दूर रहावे लागते. यापुढील कालावधीत मला कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. श्रीलंकन संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत असताना मला सहकार्य करणार्या सर्व घटकांचा मी आवर्जून आभारी आहे, इथवरची वाटचाल खेळाडू, सहकारी प्रशिक्षक, बॅकरुम स्टाफ, लंकन क्रिकेट व्यवस्थापन मंडळाच्या सहकार्यामुळेच शक्य झाली, असे ते पुढे म्हणाले.
सिल्वरवूड यांच्याप्रमाणेच महेला जयवर्धनेने देखील फलंदाजी सल्लागारपदाचा राजीनामा दिला. जयवर्धनेने आपल्या कारकिर्दीदरम्यान राष्ट्रीय संघाची इको सिस्टीम व हाय परफॉर्मन्स सेंटरवर अधिक भर दिला होता.