स्पोर्ट्स

BWF World Championships : सिंधूचे पदकाचे स्वप्न भंगले! इंडोनेशियाच्या वर्दानीकडून पराभव

बॅडमिंटनमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ध्रुव-तनिशा जोडीचेही आव्हान संपुष्टात

रणजित गायकवाड

पॅरिस : दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहावे पदक जिंकण्याचे स्वप्न शुक्रवारी भंगले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या तीन गेमच्या थरारक लढतीत तिला इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

2019 सालची विश्वविजेती आणि या स्पर्धेत एकूण पाच पदके नावावर असलेल्या सिंधूचे लक्ष्य विक्रमी सहाव्या पदकावर होते. मात्र, 64 मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात नवव्या मानांकित वर्दानीने सिंधूचा 14-21, 21-13, 16-21 असा पराभव केला.

तत्पूर्वी, भारताच्या मिश्र दुहेरीतील ध्रुव कपिला आणि तनिशा क्रास्टो या जोडीचे आव्हानही संपुष्टात आले. त्यांना मलेशियाच्या चेन तांग जी आणि तोह ई वेई या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या जोडीकडून 15-21, 13-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मिश्र दुहेरीतील पहिले पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

सिंधूची ऐतिहासिक कामगिरी आणि सध्याचा संघर्ष

हैदराबादच्या 30 वर्षीय सिंधूने 2013 मध्ये ग्वांगझू येथे आपले पहिले जागतिक पदक जिंकले होते. त्यानंतर तिने आपल्या कामगिरीत सातत्य राखत अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके (2016 रिओ रौप्य, 2020 टोकियो कांस्य) जिंकणारी सिंधू एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. मात्र, 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यापासून तिच्यासाठी काळ खडतर राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT