Pudhari
स्पोर्ट्स

Jasprit Bumrah : बुमराहने एक वर्षाचा ब्रेक घ्यावा : टीम इंडियाच्‍या माजी वेगवान गोलंदाजाने असे आवाहन का केले?

अर्धवट तंदुरुस्त असताना तो स्पर्धेत उतरतो. यानंतर वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली ऐन मोक्याच्या वेळी होतो दुखापतग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Jasprit Bumrah on Karsan Ghavari : आयपीएल २०२६ नंतर भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह अवघे दोन सामने खेळू शकला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना हुकल्यानंतर बुमराह श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतूनही बाहेर पडला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी एक अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून किमान ६ महिने ते १ वर्षाचा ब्रेक घेऊन स्वतःच्या फिटनेसवर काम केले पाहिजे, असा सल्ला घावरी यांनी दिला आहे. तसेच, या कालावधीत मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना पुन्हा राष्ट्रीय संघात संधी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

वेगवान गोलंदाज अर्धवट तंदुरुस्त असताना खेळणे अत्यंत धोकादायक

गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेल्या बुमराहबाबत बोलताना दोन विश्वचषक खेळलेले करसन घावरी म्हणाले, “निवड समितीने बुमराहची एका मालिकेसाठी किंवा एका स्पर्धेसाठी निवड करू नये. एखादा वेगवान गोलंदाज अर्धवट तंदुरुस्त असताना खेळणे अत्यंत धोकादायक असते. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर बुमराहने जेवढे सामने खेळले आहेत, त्याहून अधिक सामन्यांमध्ये तो दुखापतीमुळे अनुपस्थित राहिला आहे.”

बुमराहने क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा

‘मिड-डे’शी बोलताना घावरी म्हणाले, “बुमराहने ५ ते ६ महिने किंवा थेट एका वर्षाचा ब्रेक घेऊन १०० टक्के फिटनेस सिद्ध करायला हवा. अर्धवट तंदुरुस्त असताना तो स्पर्धेत उतरतो. यानंतर वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली ऐन मोक्याच्या वेळी दुखापतग्रस्त होतो. याची काहीच गरज नाही. पूर्ण स्पर्धेत वर्कलोड पेलण्यास तो सक्षम असेल, तरच त्याची संघात निवड केली पाहिजे.”

मागील दोन ते तीन वर्षांत बुमराहने एखादी मालिका खेळल्‍याचे दुर्मिळच

७५ वर्षीय माजी वेगवान गोलंदाजाने मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनावर जोर देत सांगितले, “शमी आणि भुवी आयपीएलमध्ये दुखापतीशिवाय सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संघात त्यांचा विचार झाला पाहिजे. प्रत्येक वेगवान गोलंदाजाला लहान-मोठ्या दुखापती होतात; पण बुमराह गेल्या २-३ वर्षांत खूपच कमी खेळला आहे. त्याने एखादी संपूर्ण मालिका खेळल्याचे दुर्मिळच आहे. हे त्याच्या स्वतःसाठी आणि देशासाठी शुभसंकेत नाहीत.”

‘बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवणे चुकीचे’

बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवणे ही योग्य रणनीती नाही, असा दावा घावरी यांनी केला. “बुमराह तिन्ही फॉरमॅट खेळू शकेल असे मला वाटत नाही. व्यवस्थापनाने त्याला फक्त कसोटी क्रिकेटपुरते मर्यादित ठेवण्याचा विचार करावा, कारण तो अत्यंत महत्त्वाचा फॉरमॅट आहे. त्याला आयपीएल, टी-२० आणि वनडे खेळायचे असेल, तरी ते आता शक्य नाही. त्यामुळे मोहम्मद सिराजला शमी आणि भुवीसारख्या अनुभवी गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे. भुवनेश्‍वर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली असल्याने त्याचा टी-२० संघात वापर करावा, तर कसोटीत शमी आणि सिराजला आलटून-पालटून खेळवता येईल. यामुळे बुमराहवरील ताण कमी होईल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT