नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग याच्या आयुष्याचा प्रवास बायोपिकच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. सिक्सरकिंग युवीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ‘द अकाऊंट’च्या माध्यमातून फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये युवराज सिंगची झलकही पाहायला मिळते. भूषण कुमार-रवी भगचांदका युवीच्या बायोपिकचे निर्माते असतील. अद्याप स्टारकास्टसंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
युवराज सिंग हे क्रिकेट जगतातील लोकप्रिय नाव आहे. 2007 मधील टी-20 वर्ल्डकपसह 2011 च्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला चॅम्पियन करण्यात युवीने मोलाचा वाटा उचलला होता. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात 3 शतकांसह 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 304 वन-डे सामन्यांत त्याने 14 शतके, 52 अर्धशतकांसह 8,701 धावा केल्या आहेत. 58 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत त्याची 1,177 धावांची नोंद आहे.