kapil dev On Bhuvneshwar Kumar comeback : माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या भारतीय टी-२० संघात झालेल्या पुनरागमनाचे जोरदार स्वागत केले आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट फिटनेसच्या जोरावर कोणत्याही खेळाडूची संघात वापसी होऊ शकते, हेच भुवीने सिद्ध केले असून यातून इतर खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास कपिल देव यांनी बुधवारी व्यक्त केला. ३६ वर्षीय भुवनेश्वर कुमारचे तब्बल चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय टी-२० संघात भुवनेश्वरला स्थान देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. हाच त्याचा भारतासाठीचा अखेरचा सामना ठरला होता. भारतीय संघातून बाहेर असतानाही भुवनेश्वरने खचून न जाता देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी सुरूच ठेवली.
गेल्या दोन आयपीएल हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. नुकत्याच पार पडलेल्या यूपी टी-२० लीगमध्ये भुवीने ११ डावांमध्ये अवघ्या ६.११ च्या इकॉनॉमीने आणि १६.०० च्या सरासरीने १४ बळी टिपत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
जेपी ग्रीन्स गोल्फ अँड स्पा रिसॉर्ट येथे आयोजित ‘कपिल देव इन्व्हिटेशनल टूर चॅम्पियनशिप’वेळी माध्यमांशी बोलताना कपिल देव म्हणाले, "भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर भुवीने प्रचंड मेहनत घेतली. स्वतःच्या फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित केले. सतत गोलंदाजीचा सराव सुरू ठेवला; याच जिद्दीच्या बळावर त्याने राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर पुनरागमन अशक्य नाही, हाच धडा त्याच्या या प्रवासातून इतर खेळाडूंना मिळेल."
भुवनेश्वरने भारतासाठी आतापर्यंत २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून टी-२० मध्ये त्याच्या नावावर ९० बळी नोंद आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
पहिला टी-२०: २२ ऑक्टोबर (क्राइस्टचर्च)
दुसरा टी-२०: २४ ऑक्टोबर (क्राइस्टचर्च)
तिसरा टी-२०: २७ ऑक्टोबर (वेलिंगटन)
चौथा टी-२०: ३० ऑक्टोबर (ऑकलंड)
पाचवा टी-२०: १ नोव्हेंबर (हॅमिल्टन)