IPL 2025 RCB Victory Celebration Bengaluru Stampede BCCI Committee Safety Guidelines Rules Protocols Victory Parade Norms
नवी दिल्ली : यंदा IPL हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावल्यावर बंगळूरुमध्ये सार्वजनिक विजय सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भविष्यातील अशा कार्यक्रमांसाठी सुरक्षा नियमावली तयार करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
BCCI च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “बंगळुरू येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक नियमावली तयार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात येत आहे.”
ही समिती BCCI चे सचिव देवजित सैकिया यांच्या अध्यक्षतेखालील असून उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि कोषाध्यक्ष प्रभतेज सिंग भाटिया हे इतर सदस्य असतील. बीसीसीआयच्या अलीकडील अॅपेक्स कौन्सिल बैठकीत या समितीची घोषणा करण्यात आली. समितीला 15 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करायचा आहे.
RCB ने IPL फायनल जिंकल्यानंतर 4 जून रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजय सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा फार कमी वेळात आणि कोणतीही औपचारिक परवानगी न घेता आयोजित करण्यात आला.
परिणामी सुमारे दोन लाख लोकांची गर्दी झाली, जी स्टेडियमच्या क्षमतेच्या खूपच पलीकडची होती. सुरक्षेचा अभाव, अपुरी तयारी आणि वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरी झाली.
विधान सौध येथून नियोजित मिरवणूक रद्द करण्यात आली होती, तरीही यापूर्वीच चाहत्यांनी मोठ्या संख्येने परिसरात गर्दी केली होती.
या घटनेनंतर RCB च्या मार्केटिंग प्रमुखासह DNA एंटरटेनमेंट कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटका क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) सचिव आणि कोषाध्यक्ष यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामे दिले आहेत.
कर्नाटक राज्य सरकारने RCB आणि BCCI दोघांनाही यासाठी जबाबदार धरले असून, आयोजनातील हलगर्जीपणावर तीव्र टीका केली आहे.
BCCI कडून सादर होणाऱ्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या, गर्दी नियंत्रण, पोलिस आणि आपत्कालीन सेवांशी समन्वय, तसेच आयोजकांच्या जबाबदाऱ्यांचे स्पष्ट नियम असतील अशी अपेक्षा आहे.
हा निर्णय भविष्यातील IPL किंवा तत्सम मोठ्या कार्यक्रमांमध्ये अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.