यावर्षी Dream11 सारख्या मोठ्या पुरस्कर्त्याला अचानक माघार घ्यावी लागली
बोर्डाने अडीच वर्षांसाठी मोठ्या रकमेचा जर्सी स्पॉन्सरशिप करारही मिळवला
मंडळाच्या 'जनरल फंड'मध्ये मोठी वाढ
BCCI income 2025
मुंबई : २०२५ या वर्षात विविध घडामोडींनतरही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असणार्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) तिजोरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 'ड्रीम ११' (Dream11) सारख्या मोठ्या पुरस्कर्त्याने (Sponsorship) अचानक माघार घेऊनही बीसीसीआयची आर्थिक ताकद जैसे थे राहिली आहे. त्याचबरोबर मंडळाच्या 'जनरल फंड'मध्ये मोठी वाढ झाली असून तो ७,९८८ कोटींवरून आता तब्बल ११,३४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रीम ११ या पुरस्कर्त्याने अचानक माघार घेतल्यानंतरही बीसीसीआयने तातडीने 'ॲडिडास' (Adidas) आणि 'अपोलो टायर्स' (Apollo Tyres) सोबत नवीन करार करून ही तूट भरून काढली आहे. विशेष म्हणजे, बोर्डाने अडीच वर्षांसाठी मोठ्या रकमेचा जर्सी स्पॉन्सरशिप करारही मिळवला आहे. यावरून बाजारपेठेतील बीसीसीआयचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
भारत सरकारने 'ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन ॲक्ट २०२५' मंजूर केला. यामुळे ड्रीम ११ ला मोठा धक्का बसला. या कायद्याने 'रियल-मनी गेमिंग'वर बंदी घातल्याने ड्रीम ११ च्या मुख्य व्यवसायावर परिणाम झाला. परिणामी, ऑगस्टमध्ये ड्रीम ११ ने ३५८ कोटी रुपयांचा स्पॉन्सरशिप करार रद्द केला. हा करार २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी होता, मात्र तो एक वर्ष आधीच संपुष्टात आला.
आयसीसी (ICC) कडून मिळणाऱ्या महसुलात घट होऊनही बीसीसीआयची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मंडळाचे माजी कोषाध्यक्ष आणि विद्यमान सहसचिव प्रभतेज सिंह भाटिया यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मसुदा अर्थसंकल्प आणि २०२४-२५ चे लेखापरीक्षित अहवाल सादर केले. या अहवालानुसार, बीसीसीआयच्या जनरल फंडात ३,३५८ कोटी रुपयांची भर पडली असून तो ११,३४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बीसीसीआयने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ८,६९३ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज वर्तवला आहे. आयसीसीकडून मिळणाऱ्या महसुलात काही प्रमाणात घट झाल्याने हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत थोडा कमी असला, तरी व्याजातून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नामुळे बोर्डाची आर्थिक स्थिती स्थिर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.