स्पोर्ट्स

BCCI on Abrar Ahmed : ‘आम्ही हस्तक्षेप का करू?’; पाकिस्तानी अबरार अहमदच्या निवडीवर बीसीसीआयची भूमिका स्पष्ट

The Hundred cricket league : ‘ज्या फ्रँचायझींनी भारताबाहेर संघ विकत घेतले...’

रणजित गायकवाड

मुंबई : 'द हंड्रेड' स्पर्धेसाठी 'सनरायझर्स लीड्स' संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदला करारबद्ध केल्यामुळे भारतात नवा वाद निर्माण झाला आहे. काव्या मारन यांच्या फ्रँचायझीने अबरारला सुमारे २.३ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (१३ मार्च) आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या वादानंतर 'सनरायझर्स लीड्स'चे अधिकृत 'X' (ट्विटर) खाते सस्पेंड झाल्याने खळबळ उडाली आहे.

मंडळाचे अधिकार क्षेत्र केवळ IPL पुरते

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले की, मंडळाचे अधिकार क्षेत्र केवळ इंडियन प्रीमियर लीगपुरते (IPL) मर्यादित आहे. आयपीएलमधील 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकी असलेल्या 'सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड'कडेच 'सनरायझर्स लीड्स'ची सूत्रे आहेत. गुरुवारी (१२ मार्च) झालेल्या लिलावात, आयपीएल मालकी असलेल्या संघांकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नाही, अशा चर्चांना अबरारच्या निवडीमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

‘ती आमची चिंता नाही’

राजीव शुक्ला यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, ‘आमचे कार्यक्षेत्र केवळ आयपीएलपुरते मर्यादित आहे. भारतीय भूभागाबाहेरील लीगमध्ये फ्रँचायझी काय निर्णय घेतात, याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. परदेशी लीगमध्ये त्यांनी कोणत्या खेळाडूला संघात घ्यावे, यात आम्ही हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. ज्या फ्रँचायझींनी भारताबाहेर संघ विकत घेतले आहेत, तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. जर ते भारताबाहेरील लीगमध्ये परदेशी खेळाडूंची निवड करत असतील, तर ती आमची चिंता नाही; कारण आयपीएलमध्ये अशा खेळाडूंना स्थान नाही.’

लिलावातील अन्य पाकिस्तानी खेळाडूंची स्थिती

'द हंड्रेड'च्या लिलावाच्या सुरुवातीला कोणतीही आयपीएल फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना पसंती देणार नाही, असे चित्र होते. 'मिस्ट्री स्पिनर' उस्मान तारिकला 'बर्मिंगहॅम फिनिक्स'ने संघात घेतले, मात्र या फ्रँचायझीचा कोणत्याही आयपीएल संघाशी संबंध नाही. दुसरीकडे सईम अयुब, हारिस रौफ आणि शादाब खान यांसारख्या खेळाडूंना मात्र कोणताही खरेदीदार मिळाला नाही.

अबरारसाठी चुरस

अबरार अहमदला मिळवण्यासाठी 'सनरायझर्स लीड्स'सोबतच 'ट्रेंट रॉकेट्स'नेही बोली लावली होती. अखेर सनरायझर्सने बाजी मारत अबरारला आपल्या ताफ्यात घेतले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते की, खेळाडूंची निवड ही केवळ त्यांची कामगिरी, उपलब्धता आणि संघाची गरज या निकषांवरच केली जाईल.

यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात घेतल्यावरही असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव पाहता, बीसीसीआयने हस्तक्षेप करत केकेआरला त्याला मुक्त करण्यास सांगितले होते. त्यानंतर बांगलादेशने टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला होता आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT