Asia Cup Trophy Row :
भारतानं पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव करत आशिया कपवर आपलं नाव कोरलं. मात्र टीम इंडियानं पाकिस्तानचे मंत्री आणि आशिया क्रिकेट काऊन्सीलचे विद्यमान अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्याचबरोबर मेडल्स देखील घेणं टाळलं. यामुळं दुबईच्या स्टेडियमवर रात्री उशिरापर्यंत हाय ड्रामा सुरू होता. दरम्यान, नक्वी हे ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये गेल्याचा देखील दावा काही माध्यमांनी केला आहे. टीम इंडियानं त्यानंतर ट्रॉफीविनाच आपलं सेलिब्रेशन केलं.
दरम्यान, याबाबत बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी टीम इंडियाच्या या कृतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. देवाजीत म्हणाले, 'त्या देशासोबत भारत युद्ध लढत आहे. त्या देशाचा नेता आमच्या संघाला ट्रॉफी देत होता. आम्ही आमच्या देशाविरूद्ध युद्धाची भाषा करणाऱ्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्विकारू शकत नाही. त्यामुळंच आम्ही ट्रॉफी स्विकारली नाही.'
ते पुढं म्हणाले, 'मात्र याचा अर्थ असा नाही की त्या गृहस्थानं आमच्या देशाची ट्रॉफी आणि आमचे मेडल हे स्वतःच्या हॉटेल रूममध्ये घेऊन जवं. हे कदापी मान्य होणार नाही. मला आशा आहे की त्यांना सद्बुद्धी लाभो आणि ते ट्रॉफी लवकरात लवकर भारतात पाठवतील. यामुळं थोडी तरी नैतिकता कायम राहील अशी आशा आहे. आम्ही त्या वक्तीकडून एवढी तरी अपेक्षा करू शकतो.
याचबरोबर देवाजीत यांनी आम्ही या मोहसीन नक्वी यांच्या कृत्याचा निषेध कडक शब्दात नोंदवणार असल्याचंही सांगितलं. बीसीसीआयच्या सचिवांनी टीम इंडियाला देण्यात येणाऱ्या २१ कोटी रूपयांच्या बक्षीसाबाबत देखील सांगितलं.
ते म्हणाले, 'बीसीसीआय अत्यंत आनंदी आहे. आम्ही पाकिस्तानला ग्रुप स्टेज, सुपर ४ आणि फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या इंडियन क्रिकेट टीमचं अभिनंदन करतो. हे तीनही सामने एकतर्फी झाले. आम्ही संघ आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करतो. त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे. आम्हाला आमच्या संघाचा अभिमान आहे. त्यांनी मैदनावर चांगली कामगिरी केली आहे.'
'आमच्या सैनिकांनी सीमेवर दमदार कामगिरी केली होती. आता भारतीय संघानं तीच कामगिरी दुबईमध्ये पुन्हा केली. त्यामुळं आमच्यासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. त्यामुळं आम्ही भारतीय संघाला रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफला २१ कोटी रूपयाचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे.'