

India Vs Pakistan :
भारतीय संघानं आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत पुन्हा एकदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं. भारतानं पाकिस्तानंच १४७ धावांचा आव्हान १९.४ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. या विजयाचा शिल्पकार तिलक वर्मा ठरला. त्यानं ६९ धावांची खेळी केली.
या विजयानंतर बीसीसीआयनं ट्विट करत मोठी घोषणा केली. बीसीसीआय आपल्या ट्विटमध्ये लिहलं की, '३ वार ० प्रतिक्रिया आशिया कप चॅम्पियन. संदेश मिळाला आहे. टीम इंडिया आणि सहकाऱ्यांना २१ कोटी रूपयाच्या बक्षीसाची घोषणा करत आहोत.'
रविवारच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा पराभव केला. यापूर्वी ग्रुप स्टेज, त्यानंतर सुपर ४ आणि आता फायनलमध्येही पाकिस्तानला भारतानं लोळवलं. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याची पार्श्वभूमी असलेल्या यंदाच्या आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान अनेक वादग्रस्त प्रसंग घडले होते. त्यामुळं आशिया कपची यंदाची फायलन हाय व्होल्टेज होती. त्यातच भारतीय संघातील आणि पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंवर आयसीसीनं कारवाईचा बडगा उगारला होता.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दमदार सुरूवात करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फिरकीपटूंनी १४७ धावात रोखत सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती. त्यानंतर फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. मात्र तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी डाव सावरत भारताचा विजय साकार केला.
तिलक वर्मानं ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा तर संजू सॅमसननं २४ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेनं २२ चेंडूत ३३ धावांची खेळी करत भारताला विजयाच्या जवळ पोहचवलं. त्यानंतर रिंकू सिंहनं चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताकडून कुलदीप यादवनं ४ तर वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
फायलन जिंकून देणाऱ्या तिलक वर्माला सामनावीराचा पुरस्कार तर अभिषेक शर्माला मालिकेचा मानकरी घोषित करण्यात आले. दरम्यान, भारतीय संघानं आशिया क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष नक्वी यांच्या हातून विजयाची ट्रॉफी आणि मेडल्स घेण्यास नकार दिला. यानंतर मैदानावर ट्रॉफी आणली गेली नाही. त्यामुळं नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी पळवली असा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे.