स्पोर्ट्स

BCCI Annual Contract: बीसीसीआय मोठा धक्का देणार... रोहित, विराटनं मैदान गाजवूनही होणार डिमोशन?

बीसीसीआय येत्या २२ डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीवेळी खेळाडूंच्या वार्षिक काँट्रॅक्टबाबत निर्णय घेणार आहे.

Anirudha Sankpal

  • रोहित विराटचे होणार डिमोशन?

  • निवृत्तीनंतरही A+ मध्ये होते कायम

  • बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट वेतनश्रेणी

  • शुभमन गिलला लागणार लॉटरी

BCCI Annual Contract Virat Kohli Rohit Sharma: भारताचे दोन सुपरस्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत दमदार खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या दोघा दिग्गजांचे वनडे वर्ल्डकप खेलण्याचे चान्सेस देखील कमी असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, बीसीसीआय येत्या २२ डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीवेळी खेळाडूंच्या वार्षिक काँट्रॅक्टबाबत निर्णय घेणार आहे. याच बैठकीत विराट कोहली अन् रोहित शर्मा हे A+ या श्रेणीत राहणार नाही नाही याचा देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

निवृत्तीनंतरही A+ मध्ये होते कायम

विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही टी २० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त वनडे क्रिकेट खेळतात त्यामुळे ते वर्षभरात फारच कमी सामने खेळत आहेत. या दोघांनी इंग्लंड कसोटी दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर २०२४ च्या टी २० वर्ल्डकपनंतरच रोहित अन् विराट निवृत्त झाले होते.

बीसीसीआयचे मागचा वार्षिक करार हा १ ऑक्टोबर २०२४ पासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत होता. टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना A+ श्रेणीत ठेवलं होतं. या श्रेणीत सहसा जे क्रिकेटपटू तीनही फॉरमॅट खेळतात त्यांना ठेवलं जातं.

डिमोशन होण्याची शक्यता

गेल्या वार्षिक करारात रोहित, विराटसह रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह देखील A+ या श्रेणीत होते. बुमराह भारतासाठी तीनही फॉरमॅट खेळतोय. तर जडेजाने देखील टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता एकच फॉरमॅट खेळणाऱ्या विराट अन् रोहित शर्मा यांचे नव्या वार्षिक करारात डिमोशन होण्याची शक्यता आहे. असं झालं तर हा रोहित आणि कोहलीसाठी मोठा धक्का मानला जाईल.

बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट वेतनश्रेणी

A+: ७ कोटी

A : ५ कोटी

B : ३ कोटी

C : १ कोटी

जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे डिमोशन होते तर या दोघांना कमीत कमी दोन कोटी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शुभमन गिलला लागणार लॉटरी

भारताचा कर्णधार शुभमन गिल सध्या सर्व फॉरमॅट खेळत आहे. तो कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार असून टी २० क्रिकेटमध्ये देखील त्याच्याकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आलं आहे. भविष्यात तो टी २० संघाचा देखील कर्णधार होण्याची शक्यता आहे.

गिल वार्षिक करारात सध्या ग्रेड A मध्ये आहे. त्याला वर्षाला ५ कोटी रूपये मिळतात. मात्र त्याचे आगामी वार्षिक करारात प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जर त्याला A+ च्या श्रेणीत बढती मिळाली तर त्याला वर्षाला ७ कोटी रूपये मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT