BCCI Reward Announcement
अहमदाबाद: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपलाच जुना विक्रम मोडीत काढत, टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघासाठी १३१ कोटी रुपयांच्या भरघोस बक्षीसाची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोस येथे विश्वचषक जिंकला तेव्हा मंडळाने १२५ कोटी रुपये दिले होते.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अहमदाबादमध्ये इतिहास रचत भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद राखले आणि बीसीसीआयनेही आपल्या बक्षीसाचा आकडा वाढवून नवा विक्रम प्रस्थापित केला. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारतीय संघाच्या देदीप्यमान विजयाबद्दल मंडळाने १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे."
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने प्रतिष्ठेचा करंडक उंचावला. या विजयासह भारत टी-२० विश्वचषकाचे जेतेपद राखणारा जगातील पहिला संघ ठरला आहे, तसेच तीन वेळा हा विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ म्हणूनही भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, असेही बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मंडळाने खेळाडू, साहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले असून भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सूर्याकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला केवळ बीसीसीआयकडूनच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही (आयसीसी ) मोठे बक्षीस मिळाले आहे. विश्वविजेत्या भारताला आयसीसीकडून ३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २७.४८ कोटी रुपये) मिळाले आहेत.
यावेळच्या विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण १३.५ दशलक्ष डॉलर्सचा विक्रमी बक्षीस निधी ठेवला होता, जो मागील आवृत्तीच्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, अंतिम फेरीतील विजयाच्या रकमेव्यतिरिक्त, भारतीय संघाला ग्रुप स्टेज आणि 'सुपर ८' फेरीतील प्रत्येक विजयासाठी प्रत्येकी ३१,१५४ डॉलर्स (सुमारे २८.६ लाख रुपये) बोनस म्हणून मिळाले आहेत.