स्पोर्ट्स

BCCI Annual Contract : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, रोहित-विराटला फटका; दोन्ही दिग्गजांचा ‌‘बी‌’ कॅटेगरीत समावेश

BCCI Annual Contract : शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा ‌‘ए‌’ गटात

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी भारतीय क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या करारांची घोषणा केली असून यात अपेक्षेप्रमाणे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने ‌‘ए+‌’ ही सर्वोच्च श्रेणीच रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याचा थेट फटका दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बसला असून, त्यांना आता बी कॅटेगरीत समाविष्ट करण्यात आले आहे.

‌‘ए+‌’ श्रेणीला कायमचा रामराम

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सूचनेनुसार तत्कालिन प्रशासकीय समितीने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी 7 कोटी रुपयांची ‌‘ए+‌’ श्रेणी सुरू केली होती. मात्र, आता ही श्रेणी इतिहासजमा झाली आहे. विराट आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने ते आता केवळ एकाच फॉरमॅटचे खेळाडू उरले आहेत. बीसीसीआयच्या नियमानुसार, एका फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सर्वोच्च श्रेणीत ठेवता येत नसल्याने त्यांना ‌‘डिमोशन‌’ देण्यात आले आहे.

शुभमन, बुमराह आणि जडेजा ‌‘ए‌’ गटात

बीसीसीआयने एकूण 30 पुरुष आणि 21 महिला खेळाडूंना करारबद्ध केले आहे. नव्या रचनेनुसार, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांसोबतच दोन फॉरमॅटचा कर्णधार शुभमन गिलला ‌‘ए‌’ गटात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आल्यामुळे गिल अद्याप तिन्ही फॉरमॅटसाठी खात्रीशीर खेळाडू नसल्याचे निवड समितीचे मत आहे. त्यामुळे बुमराहला एकट्याला ‌‘ए+‌’ मध्ये न ठेवता सर्वांना ‌‘ए‌’ गटात सामावून घेण्यात आले आहे.

मानधनाचा आकडा गुलदस्त्यात

बीसीसीआयने यावेळेस करारातील रकमेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मात्र, मागील वर्षांच्या तुलनेत ‌‘ए‌’ गटासाठी 5 कोटी, ‌‘बी‌’ गटासाठी 3 कोटी आणि ‌‘सी‌’ गटासाठी 1 कोटी रुपये वार्षिक मानधन मिळण्याची शक्यता आहे. विराट आणि रोहित यांच्यासारख्या दिग्गजांची श्रेणी घसरल्याने क्रिकेट वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT