बांगलादेशने पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानला कसोटी मालिकेत 'क्लीन स्वीप' केले आहे. या पराभवासोबतच पाकिस्तानचा संघ डब्ल्यूपीसी २०२७ च्या गुणतालिकेत (Points Table) आठव्या स्थानावर घसरला आहे.
Bangladesh vs Pakistan Test Series 2026
ढाका : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २० मे रोजी संपली. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ अंतर्गत खेळवली गेली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. यासह यजमान बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा सूपडा साफ केला आहे.
बांगलादेशने पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानला कसोटी मालिकेत 'क्लीन स्वीप' केले आहे. सिलहट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा ७८ धावांनी पराभव केला. या पराभवासोबतच पाकिस्तानचा संघ डब्ल्यूपीसी २०२७ च्या गुणतालिकेत (Points Table) आठव्या स्थानावर घसरला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक (टॉस) जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला . बांगलादेश संघाने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. यामध्ये लिटन दासच्या १२६ धावांच्या दमदार खेळीचा समावेश होता. इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा आकडाही पार करता आला नाही. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने ४, मोहम्मद अब्बासने ३ तर हसन अलीने २ बळी घेतले.
पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही आणि पाकिस्तानचा पहिला डाव २३२ धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात बाबर आझमने ६८ धावांची खेळी केली, तर फिरकीपटू साजिद खानने ३८ धावा केल्या. बांगलादेशतर्फे नाहिद राणा आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी २-२ बळी मिळाले.
पहिल्या डावाच्या जोरावर बांगलादेशला ४६ धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने ३९० धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये मुशफिकुर रहीमच्या १३७ धावांच्या खेळीव्यतिरिक्त लिटन दासच्या ६९ धावा आणि सलामीवीर महमूद हसन जॉयच्या ५२ धावांच्या खेळीचा समावेश होता. पाकिस्तानसमोर ४३७ धावांचे विशाल लक्ष्य होते.
४३७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवानने ९४, सलमान अली आगाने ७१ धावांचे योगदान दिले. कर्णधार शान मसूदच्या ७१ धावा तर बाबर आझम ४७ धावा केल्या. पाकिस्तानचा संघ ३५८ धावांवर ढेपाळला आणि हा सामना ७८ धावांनी हरला. बांगलादेशसाठी तैजुल इस्लामने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.