Bangladesh Playing In India: बीसीसीआयने नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला त्वरित रिलीज करण्याचे आदेश दिले होते. केकेआरने देखील बीसीसीआयच्या आदेशानंतर आपण मुस्तफिजूरला रिलीज केल्याचं सांगितलं. सध्या बांगलादेशातील अंतर्गत स्थिती अत्यंत स्फोटक अन् हिंसक झाली असून गेल्या काही दिवसात हिंदूंच्या हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला.
दरम्यान, बीसीसीआयच्या या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टीका केली होती. सध्या बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डामधील संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकप २०२६ च्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आयसीसीला त्यांच्या संघाचे भारतात होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे.
आयसीसी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या या मागणीवर विचार करू शकते. मात्र आता सामन्याचं शेड्युल बदलणं सोपं असणार नाही. आयसीसीने अजूनपर्यंत या बाबत कोणती अधिकृत भूमिका किंवा बैठक घेतलेली नाही. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार या निर्णयात अनेक विषयांची गुंतागुंत असणार आहेत.
सर्वात मोठी समस्या ही लॉजेस्टिकची होणार आहे. यामुळं याबाबतच्या निर्णयाला थोडा उशीर लागू शकतो. आयसीसी सर्व परिस्थिती लक्षात घेतल्यानंतरच कोणतंही पाऊल उचलण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टीत बीसीसीआयची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. वर्ल्डकप सुरू होण्यासाठी फार दिवस राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत सर्व शेड्युल बदलणं अत्यंत कठिण होमार आहे. यामुळं फक्त बांगलादेश नाही तर सर्व संघाचे वेळापत्रक बिघडणार आहे.
अशा परिस्थितीत आयसीसी आपल्या अंतर्गत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकरण पूर्णपणे बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यावर सोपवेल. यात आयसीसीला ओढू नका असं सांगितलं जाईल. आयसीसी गडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही अशी शक्यता आहे.
दरम्यान या प्रकरणात दोन्ही सरकारांची भूमिका मोठी असणार आहे. बीसीसीआय अशा प्रकारचे मोठे निर्णय हे सरकारवर सोपवते. आता भारत सरकार बांगलादेशच्या या मागणीकडे कसे पाहते त्यावर कोणता निर्णय होतो हे अवलंबून असणार आहे. नुकतेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. मात्र याबाबत आताच कोणता निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकते.
७ फेब्रुवारी - BAN vs WI, कोलकाता
९ फेब्रुवारी - BAN vs ITY, कोलकाता
१४ फेब्रुवारी - BAN vs ENG, कोलकाता
१७ फेब्रुवारी - BAN vs NEP, मुंबई