Badminton Shuttlecock Pudhari
स्पोर्ट्स

Badminton Shuttlecock Crisis: बॅडमिंटन विश्वात ‘शटलकॉक’ची टंचाई का निर्माण झाली, त्यावर पर्याय काय?

Badminton Shuttlecock Shortage Reason: नैसर्गिक पंखांची अनुपलब्धता; वाढत्या किमतींमुळे मोठी समस्या

पुढारी वृत्तसेवा

Badminton shuttlecock Crisis Reason

बीजिंग; वृत्तसंस्था : जगभरात बॅडमिंटनचा चाहतावर्ग कोट्यवधींच्या घरात पोहोचला असताना, या खेळाच्या मूळ घटकावरच आता मोठे संकट ओढवले आहे. बॅडमिंटनचा आत्मा मानल्या जाणार्‍या नैसर्गिक पंखांच्या शटलकॉकची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. या ‘शटल संकटा’मुळे आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक क्लबपर्यंत खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटनांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने काही वर्षांपूर्वी कृत्रिम पंखांच्या शटलचा प्रयोग केला होता. मात्र, खेळाडूंना अचूक फटके मारण्यात येणार्‍या अडचणी आणि शटलचा मोठा आवाज यामुळे तो अयशस्वी ठरला होता. त्यावेळी आम्ही तो विचार सोडून दिला होता; पण आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. खेळ वेगाने पुढे जात असून, शटलची समस्या अधिक गंभीर होत जाईल. आम्हाला यावर पुन्हा विचार करावाच लागेल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. नैसर्गिक शटल प्रामुख्याने बदकाच्या डाव्या पंखातील पिसांपासून बनवले जातात, ज्यांची उपलब्धता आता खूप कमी झाली आहे.

शटलकॉकला सर्वोत्तम पर्याय कोणता?

नैसर्गिक पंखांच्या शटलची जागा घेऊ शकेल, असा पर्याय शोधणे हे बॅडमिंटन विश्वासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. सध्या ‘हायब्रीड शटलकॉक’ हा सर्वात व्यवहार्य पर्याय मानला जात आहे.

हायब्रीड शटलकॉक म्हणजे काय?

याचा पाया नैसर्गिक कॉर्कचा असतो, तर पंख कृत्रिमरीत्या नायलॉन किंवा इतर सिंथेटिक पदार्थांपासून बनवलेले असतात. नैसर्गिक पंखांपेक्षा जास्त टिकाऊ, प्राण्यांच्या पंखांवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवते तसेच, उत्पादनात सातत्य राखणे शक्य असे याचे अनेक फायदे आहेत.

हायब्रीड शटलकॉकमुळे कोणत्या मर्यादा?

सध्या महाग असले, तरी भविष्यात बॅडमिंटनचा खेळ अविरत सुरू ठेवण्यासाठी हायब्रीड शटलकॉक्स हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, नैसर्गिक शटलसारखा हवेतील विशिष्ट मार्ग आणि खेळाडूंना मिळणारा ‘फील’ या हायब्रीड शटलकॉकच्या माध्यमातून अद्याप साधता आलेला नाही, ही यातील मुख्य अडचण आहे.

कसे असेल ‘3-इन-1’ हायब्रिड शटलकॉक?

हायब्रिड शटलकॉकला ‘3-इन-1’ म्हणण्यामागे त्याची अनोखी रचना आहे. हे शटलकॉक तीन मुख्य भागांपासून बनलेले आहे, जे एकमेकांशी जोडलेले असतात. पारंपरिक शटलकॉकप्रमाणे यात पिसे थेट कॉर्कमध्ये अडकवलेली नसतात. यामुळे प्रत्येक भागाची गुणवत्ता स्वतंत्रपणे जपली जाते आणि शटलकॉक अधिक कार्यक्षम बनते.

1. फायबर कॉर्क :

हे शटलकॉकच्या तळाशी असलेले कॉर्क आहे, जे पारंपरिक कॉर्कपेक्षा वेगळे आणि मजबूत आहे. हे उच्च-गुणवत्तेच्या फायबरपासून बनवलेले असल्यामुळे यात पिसांचा स्टँड बसवण्यासाठी छिद्र पाडण्याची गरज नसते.

2. कोन फेदर स्टँड :

हा मधला आणि सर्वात महत्त्वाचा भाग विशिष्ट प्रकारच्या लवचिक मटेरियलपासून बनवलेला असतो. याचे मुख्य कार्य म्हणजे रॅकेटचा फटका बसल्यावर निर्माण होणारा आघात शोषून घेणे.

3. नैसर्गिक लहान पिसे :

यामध्ये नैसर्गिक आणि लहान आकाराच्या पिसांचा वापर केला जातो. ही पिसे अधिक लवचिक आणि मजबूत असतात, ज्यामुळे ती लवकर खराब होत नाहीत.

हायब्रीड शटलकॉक्स : भविष्याची आशा

या समस्येवर तोडगा म्हणून योनेक्स आणि ली-निंग यांसारख्या क्रीडा साहित्य क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी ‘हायब्रीड शटल कॉक’वर काम सुरू केले आहे. हे शटल नैसर्गिक कॉर्क बेस आणि कृत्रिम पंखांच्या मिश्रणातून बनवले जातात. फ्रेंच बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष फ्रँक लॉरेंट यांच्या मते, हा बदल अटळ आहे. त्यांनी सांगितले, निर्माते अत्यंत तांत्रिक आणि प्रगत हायब्रीड शटल विकसित करत आहेत. मात्र, सध्या ते खूप महागडे असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत; पण मला खात्री आहे की, येत्या काही वर्षांत प्रत्येकजण याच शटलचा वापर करेल.

एका शटलकॉकसाठी किती पंख लागतात?

अव्वल दर्जाचे एक शटलकॉक तयार करण्यासाठी साधारणपणे 16 पंख लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT