Babar Azam's Copy Virat Kohli's celebration
रावळपिंडी : वर्ष होते २०२२. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तीन वर्ष शतकीखेळीपासून वंचित होता. अखेर अफगाणिस्तानविरुद्ध टी२० सामन्यात शतक झळकावत त्याने धावांचा दुष्काळ संपवला. यावेळी त्याने केलेल्या सेलिब्रेशनची स्मरण पुन्हा एकदा झाले आहे. कारण त्या सेलिब्रेशनची कॉपी बाबर आझमने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकाविल्यानंतर केली आहे. एकीकडे पाकिस्तानचे चाहते बाबरची तुलना विराटशी करतात. मात्र त्याने ज्या पद्धतीने सिलिब्रेशन केले यावरुन त्याचा विराटच गुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताचा माजी कर्णधार असलेल्या कोहलीने तीन वर्षांत एकही शतक केले नव्हते. कोहलीच्या त्यावेळच्या खराब फॉर्ममुळेच बाबरने २०२२ मध्ये सोशल मीडियावर 'This too shall pass' (हा काळही निघून जाईल) असा भावनिक संदेश देत पाठिंबा दर्शवला होता. कोहलीनेही त्याच्या मेसेजचे स्वागत केले होते. यानंतर काही महिन्यांतच हे दोन खेळाडू पुरुषांच्या आशिया चषकात आमनेसामने आले. विराटने जवळपास तीन वर्षांनंतर शतकी खेळी करत जोरदार पुनरागमन केले. कोहलीचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले ते १००० हून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आले होते. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध टी२० सामन्यात शतक झळकावले आणि त्यानंतरचा त्याचा आनंदोत्सव अविश्वसनीय होता. विराटने ड्रेसिंग रूमकडे पाहत मंद स्मित केले आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वीकारला. त्यानंतर त्याने प्रेक्षकांमध्ये असलेली आपली पत्नी अनुष्का शर्माकडे पाहात आपल्या लॉकेटला किस करत सेलिब्रेशन केले.
भारताने २०२४ मध्ये टी२० विश्वचषक जिंकल्यावर विराट कोहलीने कसोटी आणि टी२० फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. मागील काही वर्ष बाबरही आपला फॉर्म परत आणण्यासाठी धडपडत आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ त्याने स्मरणीय कामगिरी केली नव्हती. अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८३ डाव आणि ८०७ दिवसांनंतर रावळपिंडी येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबरने नाबाद १०२ धावांची खेळी केली. योगायोग म्हणजे, बाबर आणि विराट या दोघांनाही शतकाचा मोठा दुष्काळ संपवण्यासाठी ८३ डाव खेळावे लागले.
तब्बल ८३ डावानंतर शतकी खेळी केल्यानंतर बाबरनेही विराटच्या सेलिब्रेशनची कॉपी केली. त्याने कोहलीसारखेच ड्रेसिंग रूमकडे पाहत मंद स्मित केले. विराटसारखेच लॉकेटला किस करत बाबरने सेलिब्रेशन पूर्ण केले.
कोहलीने शतकांचा दुष्काळ संपवला तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या रिकी पॉन्टिंगच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूशी बरोबरी केली होती. या यादीत बाबर सध्या ३९ व्या क्रमांकावर आहे. सध्या विराट कोहलीच्या नावावर ८२ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमापेक्षा (१००) फक्त १८ शतके मागे आहे.