Cricket Tragedy incident : ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये ११ वर्षांपूर्वीच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. क्रिकेटपटू फिल फिल ह्यूजप्रमाणेच मानेला चेंडू लागल्याने १७ वर्षीय युवा क्रिकेटपटू बेन ऑस्टिन याचा मृत्यू झाला आहे. क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायी ठरलेल्या या घटनेवर अनेक क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे.
बेन ऑस्टिन हा मेलबर्नमधील एक युवा क्रिकेटपटू होता. सामन्याच्या सरावापूर्वी तो 'वँगर' (सामन्यापूर्वी चेंडू फेकण्यासाठी वापरले जाणारे यंत्र) द्वारे फेकलेल्या चेंडूमुळे जखमी झाला. विशेष म्हणजे ऑस्टिन याने हेम्लेट घातले होते, पण त्याला स्टेम गार्ड लावले नव्हते. या दुर्दैवी घटनेबाबत क्रिकेट व्हिक्टोरियाचे प्रमुख निक कमिन्स म्हणाले, "११ वर्षांपूर्वी फिल ह्यूजसोबत झालेल्या अपघाताप्रमाणे त्याच्याही मानेला चेंडू लागला होता." बेनचे वडील जेस म्हणाले, "या दुःखद घटनेने बेनला आमच्यापासून हिरावून घेतले आहे."
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेयर्ड म्हणाले, "काही दिवस असे असतात जेव्हा तुमचे हृदय तुटते. आजih त्यापैकीच एक दिवस आहे.क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो लोकांना आणि समुदायांना जोडतो. हा एक असा खेळ आहे जो खूप खोलवर अनुभवला जातो. स्पष्ट आहे की, यातून आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत, परंतु सध्या आम्ही कुटुंबाबद्दल चिंतित आहोत आणि त्यांना सर्व प्रकारे आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत."
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या एक्स (X) हँडलवर लिहिले, "काल मेलबर्नमध्ये नेट्समध्ये क्रिकेट बॉलमुळे जखमी झालेल्या आणि दुर्दैवाने मृत्यू झालेल्या १७ वर्षीय मुलाबद्दलची भयंकर बातमी. त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांना माझ्या संवेदना!"
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा २५ वर्षीय क्रिकेटपटू फिल ह्यूज याला शेफिल्ड शील्ड सामन्यात डोक्याला दुखापत झाली. त्याला सिडनीमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल कर्यात आले; पण सेरेब्रल हेमरिज म्हणजेच मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.
ऑस्टिन याने हेम्लेट घातले होते, पण त्याला स्टेम गार्ड लावले नव्हते. त्यामुळे चेंडू त्याच्या मानेवर आदळला. क्रिकेटपटूंना डोक्याच्या मागील भागाला आणि मानेला अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी हेल्मेटमध्ये स्टेम गार्ड बसवण्यात येते. तथापि, डेव्हिड वॉर्नरने स्टेम गार्डमुळे मानेची हालचाल कमी होत असल्याची तक्रार केली आहे. स्टीव्ह स्मिथने २०२३ ॲशेसदरम्यान म्हटले होते की, " स्टेम गार्डमुळे मला गुदमरल्यासारखे वाटते. मी याची तुलना एमआरआय स्कॅन मशीनमध्ये अडकल्याने करतो."